लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर

By Admin | Updated: May 22, 2014 01:17 IST2014-05-22T01:17:18+5:302014-05-22T01:17:18+5:30

जीवन जगताना मानवाला मनोरंजनाचीही गरज भासली. यातून काही लोककला अस्तित्वात आल्यात.

On the way to fading the folklore | लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर

लोककला लुप्त होण्याच्या मार्गावर

गोंदिया : जीवन जगताना मानवाला मनोरंजनाचीही गरज भासली. यातून काही लोककला अस्तित्वात आल्यात. या कलाच पुढे मनोरंजनाची साधने झालीत. तमाशा, लावणी, दंडार, नाटके आदी कला पारंपरिक रुपात सादर केल्या जायच्या. पुढे २१ व्या शतकाच्या आधुनिक काळात खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाच्या या युगात मनोरंजनाची व समाजप्रबोधनाची विविध साधने उपलब्ध आहेत. मात्र विदर्भ व महाराष्ट्राची वैभव असलेली पारंपरिक लोककला आता लुप्त होण्याच्या मार्गावर आल्या आहेत.

आता सद्यस्थितीत तान्हुल्याला झोपविण्यासाठीदेखील आईला टीव्हीवरची गाणी सुरु करावी लागतात. अशावेळी जुन्या प्राचीन लोककलांची आठवण येणे स्वाभाविक आहे. परंतु महाराष्ट्रातील व झाडीपट्टीतील अनेक प्रबोधनपर लोककला संपल्या सारख्याच झाल्या असून त्यांच्या संवर्धनाची गरज येवून ठेवली आहे. अन्यथा या लोककला नामशेष व्हायला वेळ लागणार नाही.

हे संगणक युग रिमिक्सचे असल्यामुळे अनेक लोककलांचे रिमिक्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शायरी, तमाशा, पोवाडा, लावणी, भारुड, गोंधळ, ड्रामा, दंडार, सोंग, झडत्या, पांगूळ, कलापथक, नाटके, कीर्तन अशा अनेक लोककलांद्वारे मनोरंजनातून समाजप्रबोधन व जनजागृती केली जात असे. तमाशा, लावणी, दंडार, नाटके, कीर्तन आजही थोड्याफार प्रमाणात होत आहेत. परंतु फक्त ग्रामीण क्षेत्रातच. तमाशासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात महिला शाहिरांनीसुद्धा आज आपला वेगळा ठसा झाडपट्टीत उमटविणे सुरु केले आहे, हे मात्र विशेष. लावणीमध्ये रिमिक्स केले जात आहे. त्यामुळे खर्‍या लावण्या आजकाल होताना दिसत नाही. लावणी कलावंतांच्या तालासाठी वादक वर्ग सोबतीला असे. आता कॅसेट्स, सीडी लावून लावणी सादर होते. दंडारी फक्त मंडईमध्येच दिसतात. तेही फार कमी कलावंत दंडार करतात. बोटावर मोजता येतील एवढेच दंडार आता शिल्लक आहेत. नाट्यक्षेत्राचेही तेच झाले. झाडीपट्टीत आपापल्या नाट्यकंपन्या सुरु झाल्या. आधीच्या काळी सामाजिक, धार्मिक, लावणीप्रधान नाटके व्हायची. फिरते रंगमंच बनविले जात. रंगमंदिरे होती.

रात्रभर जागून तालीम घेतल्या जात होत्या. आता कंपनीच्या नाटकांनी वचस्व प्रस्थापित केले आहे. नाचू कीर्तनाचे रंगी म्हणत किर्तने होत. गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून क्रांती केली. बहुजन समाजाला जागविले. अशी कीर्तने आजकाल होताना दिसत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पोवाडे व्हायचे. तानाजी मालुसरे आधारित पोवाडे प्रसिद्ध होते. शाहिरांच्या हातातील डफ आता फक्त जुन्या चित्रफितीमध्ये दिसते. लोककला जिवंत राहाव्यात म्हणून कलाप्रेमींनी प्रयत्न करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On the way to fading the folklore