पीक नष्ट होण्याच्या मार्गावर
By Admin | Updated: April 21, 2017 01:37 IST2017-04-21T01:37:19+5:302017-04-21T01:37:19+5:30
बाघ सिंचन व्यवस्थापन शाखेतील टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याने ३० हेक्टर शेतजमिनीतील उभे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

पीक नष्ट होण्याच्या मार्गावर
टेकरी वितरिकेतील प्रकार : अपुऱ्या पाण्यामुळे पीक वाळू लागले
कालीमाटी : बाघ सिंचन व्यवस्थापन शाखेतील टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याने ३० हेक्टर शेतजमिनीतील उभे धान पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गोंदिया येथील उपविभागीय बाघ सिंचन व्यवस्थापन विभागाकडून कालीमाटी शाखेला नेहमीच अन्यायकारक वागणूक मिळत असते. कित्येकवेळा रबी हंगामाकरिता पाळी असते. पण गोंदिया येथील राजकीय पुढाऱ्यांच्या दबावात ती रद्द केल्याचे पाणी वाटप सोसायटीचे म्हणणे आहे. यावर्षी उन्हाळी हंगामाकरिता कालीमाटी वाघ सिंचन व्यवस्थापन शाखेंतर्गत टेकरी वितरिकेला अपूर्ण पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या परिसरातील ३० हेक्टर आर शेतातील पीक नष्ट होत आहेत. येथे नेहमीच राजकीय दबावामुळे पाणी बंद करणे किंवा गेजची पातळी कमी करण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. या प्रकारासंदर्भात शेतकरी असंतोष व्यक्त करीत आहेत.
सदर शेतकऱ्यांच्या शेतीत वाळलेल्या पिकांचे निरीक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी गोंदिया, आ. संजय पुराम, जि.प. सदस्य सुरेश हर्षे, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर यांना करण्यात आली आहे.
सदर मागणी शेतकरी तथा माजी सरपंच धनीराम मटाले, अतुल डोये, बाबुलाल वाढई, अनिता बागडे, ज्ञानीराम बागडे, छत्रपाल कारंजेकर, बाबुलाल बागडे, लक्ष्मण बागडे, सुरज शेंडे, सुखदेव शेंडे, मनिराम मेंढे, प्रविण मटाले, अमृत मटाले, ज्ञानीराम आसोले, वारलू मटाले, मोहनलाल शेंडे, टेमराज वाढई, भुरा मटाले, राजकुमार मटाले, धनीराम वाढई, कोटेश्वर मटाले, मुनेश्वर बहेकार, मुन्ना भांडारकर, मनोहर वाढई, शांता वाढई, सुखदेव मटाले, उमराव शिवणकर, रविंद्र मटाले आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)