तंटामुक्तीच्या बाटली बंद संस्कृतीवर पाणी फेरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:29 IST2021-04-25T04:29:00+5:302021-04-25T04:29:00+5:30
गोंदिया: दारुच्या बाटलीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक संसार तुटण्याच्या मार्गावर असल्याचे पाहून जिल्ह्यातील महिला बचत गट व महात्मा ...

तंटामुक्तीच्या बाटली बंद संस्कृतीवर पाणी फेरले
गोंदिया: दारुच्या बाटलीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेत. अनेक संसार तुटण्याच्या मार्गावर असल्याचे पाहून जिल्ह्यातील महिला बचत गट व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील २४१ गावांत दारुबंदी झाली होती. दारुबंदीसोबतच गावांत चालणाऱ्या सट्टा, जुगार व इतर अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी तंटामुक्त समित्यांनी कंबर कसली होती. परंतु तंटामुक्त समित्यांनी केलेल्या बाटलीबंद संस्कृतीला पुन्हा सुरूवात झाली आहे.
दारूमुळे घराघरात होणारे भांडण, दारूपायी घरात आलेल्या दारिद्रयामुळे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. दारुपायी अनेक घरे भंगली आहेत. गावातील ही विदारक परिस्थिती पाहून गावाचे चित्र पालटण्यासाठी महिला महत्त्वाची भूमिका बजावितात. त्यामुळेच गावातील महिलांना हाताशी घेऊन महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी गावात दारूबंदी केली होती.? गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोन गावात, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २७ गावांत, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ३६ गावात, सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ गावात, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ४१ गावात, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १९ गावांत, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत २१ गावांत, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सात गावांत, अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ११ गावांत, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १४ गावांत, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या आठ गावात, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नऊ गावांत तर चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या १८ गावांत दारूबंदी करण्यात आली होती.? गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी जोमाने कार्य मात्र काही राजकारण्यांनी, गुंडानी त्यांना दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु राजकारण्यांचे न ऐकता तंटामुक्त समित्यांनी गोंदिया जिल्ह्यातील २४१ गावात ठराव घेऊन दारूबंदी केली होती.?
.......
शासनाच्या धोरणाने समित्या थंडबस्त्यात
परंतु महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने समित्यांनी अवैध दारूबंदीकडे दुर्लक्ष केले आहे. दारुबंदी करणाऱ्या गावात मद्य प्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यावर, दारू विक्री करताना आढळलेल्या इसमांवर दंड आकारला जात होता. दारू विक्रेत्यांची दारू पकडणाऱ्या गावकऱ्यांना बक्षीस देण्याची योजना अंमलात आणली होती. परंतु आता या संस्कृतीवर पाणी फेरण्यात आले. ग्रामीण भागात व तंटामुक्त समित्यांनी बदं केलेली दारू पुन्हा जोमाने सुरू झाली आहे.