लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : तालुक्यातील रामपुरी, अर्जुनी-मोरगाव, खांबी आणि शिरेगाव या चार प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे अनुदान बंद झाल्याने त्या १ एप्रिल २०२५ पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनांमधून मागील १२ वर्षापासून ६५ गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र शासनाच्या अनुदानाच्या अभावामुळे या योजना आर्थिक अडचणीत आल्या असून, त्यांचा खर्च भागवणे शक्य नसल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे.
मजुरी, रसायनांचा खर्च, विजेची बिले आणि देखभालीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. शासनाचे अनुदान १ एप्रिल २०१९ पासून बंद झाल्याने या योजना दरवर्षी चार ते पाच लाख रुपयांच्या तोट्यात जात आहेत. जिल्हा परिषदेमार्फत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अनुदान मिळालेले नाही, त्यामुळेच योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरणया निर्णयामुळे ६५ गावांतील नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यास भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी शासनाने तातडीने लक्ष घालून अनुदान मंजूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, लवकरच पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे.
संस्थाचालक, गावकऱ्यांचा एकमताने निर्णयया संदर्भात रविवारी (दि. १६) येथे सभा घेण्यात आली. या सभेला चारही योजनांशी संबंधित गावांचे सरपंच, संस्थेचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शासनाने १ एप्रिल २०२५ पूर्वी अनुदान मंजूर केले नाही, तर योजना बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे येत्या १ एप्रिलपासून या चारही योजनांद्वारे होत असलेला ६५ गावांचा पाणीपुरवठा बंद होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.