पाणीपट्टीची वसुली न देणाऱ्या १६ गावातील पाणी पुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST2021-04-08T04:29:08+5:302021-04-08T04:29:08+5:30
गोंदिया : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच उन्हाची भीषण दाहकता सुरू झाली. यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत ...

पाणीपट्टीची वसुली न देणाऱ्या १६ गावातील पाणी पुरवठा बंद
गोंदिया : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच उन्हाची भीषण दाहकता सुरू झाली. यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपट्टीचे थकीत असलेले पैसे न दिल्यामुळे आमगाव तालुक्यातील १३, तर सालेकसा तालुक्यातील ३ अशा १६ गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.
आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत सुरूवातीला ४८ गावांना या योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येते. परंतु सद्यस्थितीत केवळ ३८ गावांना पाणी पुरवठा केला जातो. शुध्द पाणी घेणारे नळ ग्राहक महिन्याकाठी पैसे देत नाही किंवा ग्रामपंचायतीकडून पैसे वसुली केली जात नसल्याने या योजनेचा पाणी पुरवठा होत असलेल्या गावांतील वारंवार पाणी पुरवठा बंद करण्यात येतो. ७ एप्रिलपासून आमगाव तालुक्यातील १३, तर सालेकसा तालुक्यातील ३ गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील बोरकन्हार ४ लाख १२ हजार ७२०, बाम्हणी ३ लाख ७३ हजार, शिवनी ४ लाख ३५ हजार ३२८, चिरचाळबांध ५ लाख ३१ हजार ४२०, खुर्शीपार ३ लाख ४५ हजार ९७०, जवरी ३ लाख ५३ हजार ६००, बोथली ३ लाख १ हजार ४४०, सुपलीपार २ लाख ५३ हजार ६२०, कालीमाटी ३ लाख ६० हजार ७४२, किकरीपार ३ लाख ९७ जार ५८४, ननसरी १ लाख २८ हजार १८०, फुक्कीमेटा २ लाख २० हजार २५२, धामणगाव ९५ हजार ६९० असे एकूण ४२ लाख ९ हजार ५४६ रुपये, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ५ लाख ९६ हजार ७६४, कारुटोला १ लाख ९० हजार ५७६, हेट्टी १ लाख ८९ हजार ४७० एकूण ९ लाख ७६ हजार ८१० रुपये थकीत आहेत.
बॉक्स
नगर परिषद क्षेत्रातील गावांचाही होणार पाणी पुरवठा ठप्प
आमगाव नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या बनगाव, आमगाव, पदमपूर, कुंभारटोली, रिसामा, किडंगीपार अशा सर्व गावांतील पाणी पुरवठा बंद होणार आहे. बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे ९ लाख १८ हजार ४०६ रुपये आमगाव नगर परिषदेवर थकीत आहेत. तहसीलदार यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित वसुली करून बिलाचा भरणा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बॉक्स
सरपंच व ग्रामसेवकांनी घ्यावा पुढाकार घ्यावा
उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना पाणी पुरवठा बंद होऊ नये, यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी खबरदारी घ्यावी. वेळीच ग्राहकांकडून वसुली करून पाणीपट्टीचे पैसे भरण्यात यावे, जेणेकरून योजना चालवण्यात अडचण होणार नाही.