येत्या १५ दिवसांत सुरू होणार पाणी पुरवठा
By Admin | Updated: June 19, 2014 23:54 IST2014-06-19T23:54:10+5:302014-06-19T23:54:10+5:30
शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या सिव्हील लाईंस पाणी टाकीतून येत्या १५ दिवसांत पाणी पुरवठा सुरू करण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे नियोजन आहे.

येत्या १५ दिवसांत सुरू होणार पाणी पुरवठा
सिव्हिल लाईनची टाकी सज्ज : सुरू आहे पाईपलाईनची चाचणी
गोंदिया : शहराच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या सिव्हील लाईंस पाणी टाकीतून येत्या १५ दिवसांत पाणी पुरवठा सुरू करण्याचे महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे नियोजन आहे. सुमारे २१ लाख ३५ हजार लीटर क्षमता असलेल्या या टाकीतून सिव्हील लाईनसह लगतच्या परिसराला पाणी पुरवठा केला जाणार आहे. या टाकीच्या क्षेत्रात येणाऱ्यांना १५ दिवसांनतरच नळ कनेक्शन देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
शहरवासीयांना २४ तास पाणी पुरवठा व्हावा या उद्देशातून शासनाने वाढीव पाणी पुरवठा योजना शहराला दिली. या योजनेंतर्गत शहरातील सिव्हील लाईंस, सुर्याटोला व भिमनगर परिसरात पाणी टाकीचे बांधकाम करण्यात आले. सिव्हील लाईंस स्थित पाणी टाकी ही सर्वाधीक क्षमतेची टाकी असून तिची क्षमता २१ लाख ३५ हजार लीटर आहे. विवेकानंद कॉलनीत या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या टाकीचे बांधकाम पूर्ण झाले असून सध्या टाकीत पाणी भरून पाईप लाईन मधील लिकेज टेस्टींगचे काम सुरू आहे.
या टाकीतून शहरातील पोस्ट आॅफीस, जिल्हाधिकाऱ्यांचा जुना बंगला, हनुमान मंदीर, इंगळे चौक, बोडी, नुरी चौक, शितला माता मंदीर, जयपुरिया हॉस्पीटल, केमीस्ट भवन, साई मंदिर, मामा चौक, पी.ए.राईस मील, पंचायत समिती कॉलनी, विवेकानंद कॉलनी आदी परिसरात पाणी पुरवठा केला जाणार आहे. यासाठी लागणाऱ्या पाईप लाईनचे कामही पूर्णत्वावर आहे. एकंदर सर्व कामे पूर्ण झाली असून पाईप लाईनच्या टेस्टींगचे काम सुद्धा येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असून पाईप लाईन साफ केल्यानंतर येत्या १५ दिवसांत टाकी पाणी पुरवठ्यासाठी सज्ज होणार असल्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांच्या अंदाज आहे. त्यामुळेच येत्या १५ दिवसांत या टाकीतून पाणी पुरवठा सुरू करण्याच्या तयारीत सध्या विभागाचे अधिकारी लागले आहेत.
तर या टाकीच्या क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना या टाकीचे नळ कनेक्शन देण्यासाठी सुद्धा सोबतच सुरूवात केली जाणार आहे. विशेष म्हणजे सध्या असलेली जुनी पाईप लाईन बंद केली जाणार आहे. तर ज्यांच्याकडे काही थकीत नाही त्यांना नाहरकत प्रमाणपत्र देऊन विभागाच्या काही प्रक्रिया पूर्ण करून कनेक्शन दिले जाणार आहे. तसेच नवीन कनेक्शनसाठी ठरविण्यात आलेली रक्कम भरून व विभागीय प्रक्रिया पूर्ण करून कनेक्शन दिले जाणार असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगीतले. (शहर प्रतिनिधी)