उन्हाळी पिकांवर पाणी टंचाईचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 01:52 IST2016-03-06T01:52:16+5:302016-03-06T01:52:16+5:30
यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची झळ बसणार अशा संशय पुर्वीच शेतकऱ्यांना होता.

उन्हाळी पिकांवर पाणी टंचाईचे सावट
भूजल पातळी खालावली : पिके सुकण्याच्या मार्गावर
रावणवाडी : यावर्षी अत्यल्प पाऊस पडल्यामुळे उन्हाळ्यात पाण्याची झळ बसणार अशा संशय पुर्वीच शेतकऱ्यांना होता. परंतु फेबु्रवारीच्या शेवटीच विहिरीतील पाण्याची पातळी खालावल्याचे शेतकरी बोलत आहेत. त्यामुळे मे व जून महिन्यात पाणी टंचाईच्या सामना करावा लागणार असल्याचे आताच दिसून येत आहे.
यावर्षी अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. जून, जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पावसाअभावी दुबार-तिबार पेरणी करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. अत्यल्प पावसामुळे शेकडो हेक्टर शेतातील पीके करपून गेली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. मात्र फेबु्रवारी महिन्यातच पाण्याची पातळी खालावणार नाही असे शेतकऱ्यांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही व भूजल पातळी खालावली असे शेतकऱ्यांचे बोलणे आहे.
गतवर्षी या महिन्यात विहिरींना मुबलक पाणी होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाचे नियोजन केले. त्यानुसार शेतात भाजीपाला, गहू, टरबूज, काकडी, लवकी आदी पिकांची लागवड केली. मात्र फेबु्रवारीच्या अखेरच पाण्याची पातळी खालावल्याने रब्बी हंगामातही खरीपा प्रमाणे पीक हाती येईल किंवा नाही अशी शंका आता पासूनच शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
खरीप हंगामात धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, जवस, लाखोळी आदी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. यावर पर्याय म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. अशा शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकाची लागवड केली.
फेबु्रवारी महिन्याच्या अखेरीस बहुतांश भागातील विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आतापासूनच अशी परिस्थिती निर्माण झाली तर मे व जून महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)