बोअरमुळे वाढणार पाणी टंचाईची समस्या
By Admin | Updated: March 6, 2015 01:45 IST2015-03-06T01:45:11+5:302015-03-06T01:45:11+5:30
शासनाने गावा-गावात पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जलस्त्रोत विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे.

बोअरमुळे वाढणार पाणी टंचाईची समस्या
केशोरी : शासनाने गावा-गावात पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून जलस्त्रोत विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शेतकरी विनापरवानगी एका शेतात दोन-तीन ठिकाणी मशीनव्दारे बोअर करून पाण्याचा उपसा अधिक प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी वापरात येणाऱ्या गावातील विहिरींची पाण्याची पातळी कमी होऊन त्या आटत चालल्या आहेत. या प्रकाराने उन्हाळ्यात केशोरी येथे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
या परिसरात पाण्याची सिंचन व्यवस्था नसतानासुध्दा या भागातील शेतकरी उन्हाळी धानपीक घेतात. धानासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी वापरण्यात येत आहे. तसेच एका बोअरवेलमधून पाणी पुरत नसल्याचे सांगून एक शेतकरी एका शेतावर दोन-दोन, तीन-तीन मशीनव्दारे बोअर करून जमिनीच्या भूगर्भातील पाण्याचा उपसा आवश्यकतेपेक्षा अधिक करीत आहेत.
केशोरी येथील पिण्याच्या पाण्यासाठी वापरात असलेल्या विहिरीतील पाण्याची पातळी कमी होवून विहिरी पूर्णत: आटत चालल्या आहेत. आता फक्त मार्च महिना सुरू आहे. पूर्ण उन्हाळा अजून शिल्लक आहे. आताच विहिरीमधील पाणी आटत चालल्याने वेळीच प्रशासनाने याची दखल घेणे अपेक्षित आहे. अन्यथा मोठ्या भिषण संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही व पाण्यासाठी वनवन भटकावे लागेल.
विनापरवानगीने शेतात बोअर खोदण्याऱ्या शेतकऱ्यांना जमिनीतील पाण्याचा उपसा करण्यास बंदी घालण्यात यावी आणि गावाशेजारी लागून असलेल्या जमिनीमध्ये बोअर मारण्यास शासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. (वार्ताहर)