आटत आहेत जिल्ह्यातील जलस्रोत
By Admin | Updated: February 12, 2015 01:20 IST2015-02-12T01:20:49+5:302015-02-12T01:20:49+5:30
या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील पाण्याचे विविध स्त्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे यंदा पाण्याच्या समस्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आटत आहेत जिल्ह्यातील जलस्रोत
गोंदिया : या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच जिल्ह्यातील पाण्याचे विविध स्त्रोत आटत चालले आहेत. त्यामुळे यंदा पाण्याच्या समस्येत मोठी वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जिल्ह्यात चार प्रमुख जलाशय आहेत. यापैकी एक कालीसरार मागील तीन महिन्यांपूर्वीच पूर्णत: आटले आहे. सध्या इटियाडोहमध्ये ५९.९० टक्के, सिरपूरमध्ये ४५.३२ टक्के व पूजारीटोला जलाशयात २१.३८ टक्के पाणी उरले आहे. इटियाडोह व पूजारीटोला जलाशयातून सिंचनासाठी पाणी दिले जात आहे. त्यामुळे सदर दोन्ही तलाव तीव्रतेने रिक्त होत आहेत.
मध्यम प्रकल्पाच्या १० पैकी सहा तलाव, लघु प्रकल्पाच्या १९ पैकी सहा व मालगुजारीच्या ३८ पैकी १९ तलावांत केवळ १० टक्के पाणी उरले आहे. यापैकी १२ ठिकाणी पाण्याचे स्त्रोत लघुत्तम स्थितीत आहेत. याशिवाय चार ठिकाणांवर एक टक्के, पाच ठिकाणी दोन टक्क्यांपेक्षा कमी पाणी उरले आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जलाशय व तलावांत पाणी खूपच कमी उरले आहे. जिल्ह्यात पाण्याची किती मोठी समस्या उद्भवू शकते, याबाबत अंदाज लावले जावू शकते. ज्या कालीसरार जलाशयात तीन महिन्यापूर्वीच पाणी आटले, तेथे आजच्या स्थितीत मागील वर्षी ४१.७६ टक्के पाणी होते. इटियाडोहात ७२.४५, सिरपूरमध्ये ९१.१७ व पूजारीटोला जलाशयात ४०.११ टक्के पाणी मागील वर्षी आजच्या स्थितीत बाकी होते.
मध्यम प्रकल्पाच्या संग्रामपूर, लघु प्रकल्पाच्या वडेगाव, जुन्या मालगुजारी तलावांतून भानपूर, बोपाबोडी, भिवखिडकी, चान्ना बाक्टी, चिरचाडी, धाबेटेकडी, कोसबीबाकी, पालडोंगरी, तेढा, ताडगाव तलाव पाण्याच्या अत्यंत पातळीवर आलेले आहेत. स्थानिक स्तरावरील छत्तरटोला, सालेगाव व चारभाटा तलावसुद्धा पाण्याच्या लघुत्तम पातळीच्या खाली पोहचले आहेत. हीच स्थिती राहिल्यास उन्हाळ््यात पाणी पेटणार यात शंका नाही. (प्रतिनिधी)
पाऊल ठरेल लाभदायक
बुधवार (दि.११) सकाळी ६ वाजता जिल्ह्यात पाऊस आला. हा पाऊस उन्हाळी धानपिकांची रोवणी झालेल्या रोपट्यांना लाभदायक ठरेल. तसेच या पावसाचा रबीच्या पिकांनासुद्धा फायदा होईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए.एस. भोंगाडे यांनी सांगितले आहे.
तलावांतील पाण्याची तुलना (यावर्षी व मागील वर्षी)
मध्यम प्रकल्पाच्या तलावांतील बोदलकसा येथे ६.८१ (३८.७९), चोरखमारा ०.९३ (४६.७५), चुलबंध ८.४८ (६२.२०), खळबंदा ९.९२ (६३.६१), रेंगेपार १.९९ (५४.९५), लघु प्रकल्पाच्या गुमडोह २.३० (२६.२१), हरी ०.८५ (५५.४६), पांगडी १.४६ (२६.६९), रिसाला १.४२ (२२.५६), सडेपार १.६४ (५४.८४), जुन्या मालगुजारी तलावांच्या फुलचूर ७.९१ (८२.०१), खैरी ३.६५ (४१.६१), ककोडी ९.५५ (९.५५), काटी १.३५ (१२.७४), खोडशिवणी ८.२२ (५०.१०), खाडीपार ५.६६ (१९.५०), मुंडीपार ०.९२ (४.५९), मेंढा ९.६६ (३४.६६) नांदलपार १२.९२ (५७.७५), पळसगाव डव्वा २.०१ (२१.८३) पाणी आहे. कंसात दिलेले अंक मागील वर्षी असलेल्या पाण्याची आजची स्थिती तर कंसाबाहेरचे अंक यावर्षीची आजची स्थिती दर्शवितात.