तालुक्यात पाणी पेटले
By Admin | Updated: May 6, 2015 00:56 IST2015-05-06T00:56:04+5:302015-05-06T00:56:04+5:30
सडक-अर्जुनी तालुक्यातील आता बहुतेक गावांत पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

तालुक्यात पाणी पेटले
सडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी तालुक्यातील आता बहुतेक गावांत पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पाण्याची पातळीच खोलात गेल्याने अनेक विहिरी आटल्या असून कित्येक बोअरवेल्समधून पाणी निघतच नाही.
तालुक्यातील वडेगाव, परसोडी, डोंगरगाव-खजरी, तिडका, परसोडी, पुतळी, केसलवाडा, चिखली, कनेरी, कोकणा-जमी, चिंगी, खोबा, सौंदड, हेटी, कोसमतोंडी, पांढरी, डुंडा, घोटी, रेंगेपार, चिरचाडी, जांभळी, दोडके, मसरामटोला, शेंडा, पुतळी, सहाकेपार, कोयलारी, डुग्गीपार, बाम्हणी, खडकी, मोगरा, दल्ली, कन्हारपायली, बिंद्राबन, म्हसवाणी, बोथली, बकी, सडक-अर्जुनी, कोहळीटोला, तिडका, सालेधारणी आदी गावातील पाण्याची पातळी खोलात गेली आहे. त्यामुळे विंधन विहिरी व सार्वजनिक विहिरींत पाणी नसल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
सडक-अर्जुनी तालुक्यात ६३ ग्राम पंचायती आहेत. नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी शासकीय विंधन विहीर ८४४ आहेत. त्यापैकी ४२ विंधन विहिरींना पाणी नसल्यामुळे बंद पडल्या आहेत. सार्वजनिक विहिरी ३७६ आहेत. त्या विहिरींपैकी ४५ विहिरी पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत.
ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे ३४ पंप सेट आहेत. त्यापैकी दोन पंप सेट बंद पडले आहेत. लघु नळ योजना २१ असून सर्वच सुरू आहेत. त्यापैकी बहुतेक लघु नळ योजनांच्या विंधन विहिरींना उन्हाळ्याच्या दिवसांत पाणी पुरेसा मिळत नाही. त्यामुळे गावातील बहुतेक नागरिकांना दोन ते चार बादली पाणी घेऊन समाधान मानावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तालुक्यातील पुतळी व बाह्मणी येथील पाणी पुरवठा योजनेंतर्गत वर्षभरही शुध्द पिण्याचे पाणी जनतेला मिळू शकले नाही. त्या दोन्ही गावांतील पाणी पुरवठा योजना पूर्ण बंद पडल्या आहेत.
या योजना बंद पडल्यामुळे चोरट्यांनी मोटार पंप, पाईप, खांब लाईट आदी महागडी वस्तू लंपास केल्याचे दिसत आहे. या योजनेकडे कोणत्याही अधिकाऱ्यांचे व पदाधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसत आहे.
या दोन्ही योजना खऱ्या अर्थाने सुरू राहिल्यास सडक-अर्जुनी तालुक्यातील पाणी समस्या संपुष्ठात येवू शकते. (शहर प्रतिनिधी)