शालेय शिष्यवृत्तीच्या कागदांसाठी भटकंती
By Admin | Updated: December 1, 2014 22:57 IST2014-12-01T22:57:28+5:302014-12-01T22:57:28+5:30
देवरी येथील एसडीओ कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक विद्यार्थी आपल्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे.

शालेय शिष्यवृत्तीच्या कागदांसाठी भटकंती
आमगाव : देवरी येथील एसडीओ कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक विद्यार्थी आपल्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे. अनेक पालकांनी एसडीओवर कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
देवरी येथील उपविभागीय महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहेत. सदर कार्यालय राम भरोसे झाले आहे. विद्यार्थी व पालकांचा कोणी वाली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटची तारीख शिष्यवृत्ती फार्म भरण्याची होती. आॅगस्ट महिन्यापासून जात प्रमाणपत्र व शिष्यवृत्तीला लागणारे सर्व कागदपत्र सेतुमधून तयार करून एसडीओ कार्यालयाला पाठविण्यात आले. अनेक विद्यार्थी व पालकांकडे सेतुकेंद्रात पैसे भरल्याची पावती आहे.
माहे आॅगस्ट पासून कागदाकरिता अनेकांची भटकंती सुरु आहे. तीन ते चार वेळा आमगाव ते देवरी येथे विद्यार्थी व पालकांनी जाऊन पायपीट केली मात्र हातात काही आले नाही. कार्यालयात मोठ्या प्रमाणात कागदाचे गठ्ठे पडले आहेत. ज्याला आवश्यकता आहे त्यांनी देवरी कार्यालयात जाऊन कागद गठ्यातुन शोधावे व अधिकारी एसडीओ सोनवाने यांची सही घेऊन यावे हीच दिनचर्या या कार्यालयात सुरु आहे. काही विद्यार्थ्यांचे कागद या शोधाशोधीमुळे देवरी कार्यालयातून गायब झाले आहे.
शोधून अनेक थकले मात्र कागद मिळत नाही. त्यामुळे वर्ग १० ते ११ चे विद्यार्थी त्यांना मिळणाऱ्या हक्काच्या शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार हे निश्चित. यामुळे विद्यार्थी व पालकांतून रोष व्यक्त होत असून एसडीओ सोनवाने व संबंधित लिपिकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)