वाटचाल भयमुक्तीच्या दिशेने..
By Admin | Updated: May 21, 2015 00:58 IST2015-05-21T00:58:35+5:302015-05-21T00:58:35+5:30
एकेकाळी पोलीस येतांना पाहून दारे बंद करणारे आदिवासी नागरिक आता खुल्या मनाने पोलिसांना सहकार्य करू लागले आहेत.

वाटचाल भयमुक्तीच्या दिशेने..
गोंदिया : एकेकाळी पोलीस येतांना पाहून दारे बंद करणारे आदिवासी नागरिक आता खुल्या मनाने पोलिसांना सहकार्य करू लागले आहेत. गोंदिया पोलिसांनी मागील पाच-सहा वर्षापासून नागरिकांशी वाढविलेला संवाद आणि त्यातून संपादन केलेला त्यांचा विश्वास यामुळे आदिवासी नागरिक पोलिसांना सहकार्य करू लागले आहेत. यातूनच नक्षल कारवायांवर आळा घालण्यात पोलिसांना यश आले असून जिल्ह्याची नक्षलवादाच्या दहशतीतून मुक्तता होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यात नक्षल्यांच्या थेट कारवाया नसल्या तरी दंडकारण्याचा हा परिसर नक्षलवाद्यांचे ‘रेस्ट झोन’ म्हणून ओळखल्या जाते. गडचिरोली किंवा छत्तीसगड भागात हिंसक कारवाया केल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील सीमेलगतच्या सालेकसा, देवरी तालुक्यातील जंगलात लपून बसायचे ही नक्षल्यांची कार्यपद्धती अनेक दिवसांपासून आहे. मात्र स्थानिक नागरिकांच्या सहकार्याशिवाय त्यांना कोणतेही काम करणे शक्य नाही. त्यामुळेच स्थानिक नागरिकांमध्ये आपली दहशत कायम ठेवण्यासाठी अधूनमधून नक्षल्यांकडून हिंसक कारवायाही करण्यात येतात.मात्र गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात कुठेही नक्षल्यांच्या हिंसक कारवाया यशस्वी झाल्या नाहीत. नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्याचाच हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.
सन २०१४ मध्ये नक्षलशी संबंधित तीन घटना घडल्या. त्यात दोन चकमकी झाल्या. मात्र कुणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला. भूसुरूंग स्फोट करण्यासाठी नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी आधीच जप्त केली. यावर्षी इळुकचुवा येथे नक्षलवाद्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. एकंदरीत गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होऊन पोलिस त्यांच्यावर वरचढ ठरले आहेत. स्थानिक नागरिकांशी जुळवून घेतल्यामुळेच पोलिसांना हे यश मिळाले आहेत. (तालुका प्रतिनिधी)
मेळावे, योजनांच्या लाभातून नागरिकांशी जवळीकता
तंटामुक्त गाव मोहीम अंमलात आणल्याबरोबर पोलिस व आदिवासी नागरिक यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण झाले. जिल्हा पोलिसांनी लोकांमध्ये जाऊन नक्षलवादाचे समूळ उच्चाटन कसे करता येईल यासाठी जनजागृती केली. तीव्र नक्षलग्रस्त भागात जनजागरण मेळावे राबविण्यात आले. शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी एकत्र आले. अतिदुर्गम भागातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेतला. वृध्दांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, वृद्धापकाळ योजनेचा लाभ मिळवून दिला. तरूणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी किंवा त्या तरूणांनी नक्षलवादाकडे वळू नये यासाठी पोलिसांनी त्यांच्यासाठी विविध नोकरीविषयक प्रशिक्षण देण्याची सोय केली. पोलीस भरती प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. तीन महिन्याचे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. गरजूंना रेशन कार्ड तयार करण्यात आले. तरूणांना चांगली शरीरयष्ठी ठेवण्यासाठी व्यायामशाळा उभारल्या. पोलीस पार्टीच्या सतत ग्रामभेटी घेऊन गावातील समस्या सोडविण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाला आहे.
आठपैकी चार तालुके वगळण्याची शिफारस
गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव आणि आमगाव या तालुक्यात कोणत्याच नक्षल कारवाया झाल्या नाहीत. त्यामुळे हे तालुके नक्षलग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळण्यात यावे, अशी शिफारस गेल्या दोन वर्षात सलग दोन वेळा गृहविभागाकडे करण्यात आली. त्यानुसार ते चार तालुके नक्षलग्रस्तांच्या यादीतून वगळण्यातही आले होते. परंतु नक्षल भत्त्यासह योजनांसाठी मिळणाऱ्या अधिक निधीचे नुकसान होईल असे कारण देत विविध संघटनांनी आणि राजकीय मंडळींनी प्रशासनावर दबाव आणत पुन्हा त्या चारही तालुक्यांना नक्षलग्रस्त म्हणून घोषित केले.