धापेवाडा प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: April 28, 2016 01:36 IST2016-04-28T01:36:49+5:302016-04-28T01:36:49+5:30
तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेला धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे

धापेवाडा प्रकल्पाच्या पाण्याची प्रतीक्षा
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून ओळख असलेला धापेवाडा प्रकल्प वैनगंगा नदीवर कवलेवाडा येथे अदानी समूहाच्या व पाटबंधारे विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आला. ४४.०५ दलघमी (१५.५६ टी.एम.सी.) पाणी क्षमतेच्या या प्रकल्पात वैनगंगा नदीतील ३२७ द.ल.घ.मी. (११.५५ टी.एम.सी.) पाणी शेतीसाठी आहे. मात्र संबंधित यंत्रणेच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकऱ्यांना पाणीच मिळणे कठीण झाले आहे.
या प्रकल्पातून अदानी वीज प्रकल्पासाठी वार्षिक २.४७ टी.एम.सी. पाणीसाठा पुरवठा करण्यास शासनाने मंजूरी दिली. त्यानुसार पाणी पुरवठा केला जातो. पण शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कोणतेही नियोजन केले जात नाही. या प्रकल्पात पाणी भरले असल्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन करुन विद्युत पंप लावले. अनेक बेरोजगार शेतीकडे वळले. पण वैनगंगेत पाणीच नसल्याने संपूर्ण लावलेले रबी पीक जळून गेले आहे. लाखो रुपये खर्च करुनही हाती काहीच येणार नाही. उलट कर्जाचा बोझा वाढणार आहे. चांदोरी खुर्द, पिपरिया, सावरा, अर्जुनी, बिहिरीया, मुरदाडा, महालगाव, किडंगीपार, करटी बु., इंदोरा व इतर ठिकाणी बोअरवेलने उपसा केला जातो. मात्र परसवाडा खैरलांजी, बोरा, बघोली व इतर गावे तहानलेलीच आहेत. प्रकल्पात फक्त ४ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे.
या प्रकल्पात १७.५ दशलक्ष पाणीसाठा उपलब्ध होता. ते पाणी गेले कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. कवलेवाडा ते सावरापर्यंत वैनगंगा नदी तुडूंब भरून होती. १५ मार्च पर्यंत पाणी होते. अचानक पाणी एवढ्या झपाट्याने एका महिन्यात कमी झाले कसे? धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. शेतकऱ्यांना पाणी देणे बंद होते. त्या कालावधीत कार्यकारी अभियंता यांनी प्रकल्पातील दोन-तीन दार उघडून पाणी सोडले असल्याने पाणीसाठा कमी झाला.
नियोजन बरोबर नसल्याने त्याचा त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. लोकप्रतिनिधींनी श्रेय लाटले. शेतकऱ्यांना भोगावे लागले. (वार्ताहर)
‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई होणार?
प्रकल्पात एवढे मुबलक पाणी होते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी रबी पीक घेण्याची मानसिकता तयार केली व शेतीची मशागत केली. पीक लावले, मात्र शेवटच्या टोकावर आलेल्या शेतात पाणीच पोहोचले नाही. पाणीसाठा कमी असल्याचे कधीही कार्यकारी अभियंता यांनी शेतकऱ्यांना सांगितले नाही. साधी नोटीसही दिली नाही. या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. पाणीसाठा कमी झाल्याने डबक्यातील पाणी जेसीबीच्या साह्याने नाली करून पंपाजवळ नेले जात आहे.
बावनथडी व संजय सरोवराचे पाणी सोडा
बावनथडी प्रकल्प वैनगंगा बपेरा चांदोरीपासून ४० ते ५० कि.मी. अंतरावर आहे. या धरणातून पाणी सोडले तर रात्रभरात पाणी वैनगंगेत येते. संजय सरोवराचे पाणी दोन-तीन दिवसात येते. पाणी कधी सोडले जाणार अशी विचारणा शेतकऱ्यांनी आ.विजय रहांगडाले यांच्याकडे केली. त्यांनी संजय सरोवरचे पाणी सोडण्यात यावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्याचे सांगितले. याबाबत शेतकऱ्यांनी मुरदाड्यात आमदारांना व्यथा सांगितली आहे. पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र पाणी मिळाले नाही. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मे महिन्यात येणार असल्याचे सांगितले जाते.