रेल्वे उड्डाणपुलाची प्रतीक्षा ‘जैसे थे’

By Admin | Updated: September 1, 2014 23:42 IST2014-09-01T23:42:30+5:302014-09-01T23:42:30+5:30

आमगाव-गोंदिया राज्य मार्गावर किंडगीपार येथील मुंबई हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी माल वाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरली आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर

Waiting for the train flyover were like ' | रेल्वे उड्डाणपुलाची प्रतीक्षा ‘जैसे थे’

रेल्वे उड्डाणपुलाची प्रतीक्षा ‘जैसे थे’

आमगाव : आमगाव-गोंदिया राज्य मार्गावर किंडगीपार येथील मुंबई हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी माल वाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरली आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित आहे. अनेकदा मागणी करूनही लोकप्रतिनिधींनी नेहमी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या भावना भडकल्या आहेत. तर पुलाची ही प्रतीक्षा केव्हा संपणार, याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत.
आमगाव तालुका औद्योगिक व्यवसायाकडे क्रांतिकारक वाटचाल करीत आहे. बाजारपेठेचा केंद्र असल्याने या ठिकाणी वाहनांची वर्दळ नेहमीच असते. आमगाव येथील राज्य मार्गावरून सालेकसा, डोंगरगड तर आमगाव- देवरी ते रायपूर-कोलकाता हा रस्ता महामार्गाला जोडला गेला आहे. त्यामुळे माल वाहतूक व प्रवासी वाहनांची वर्दळ या मार्गावर सतत असते. परंतु या वाहनांना आमगाव-गोंदिया राज्य मार्गावर असलेल्या किंडगीपार येथील रेल्वे चौकीमुळे प्रत्येक दहा मिनिटाला थांबा घ्यावा लागतो. त्यामुळे आवश्यक असलेली सेवाही प्रभावित होते. या ठिकाणी अनेक वर्षापासून उड्डाणपुलाची मागणी जोर धरत आहे. परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे ही समस्या मार्गी लावण्यात असमर्थ ठरली आहे. किंडगीपार येथील रेल्वे चौकीवर उड्डाणपूल व्हावे यासाठी नागरिकांनी मागणी रेटली आहे. या मागणीला सन २००६ मध्ये रेल्वे विभागाने पुढाकार घेवून सर्व्हेक्षणही उरकले. परंतु या उड्डाणपुलाचे घोडे कुठे थांबले, हे सलग सहा वर्षे लोटूनही कुणालाही माहीत नाही. या रेल्वे चौकीेला ओलांडून प्रत्येक आढवड्याला दीड ते दोन लाख वाहन मार्गक्रमण करतात. परंतु प्रत्येक वेळी रेल्वे मार्गावरील धावत्या गाड्यांमुळे चौकी बंद पडून या ठिकाणी वारंवार वाहनाची कोंडी निर्माण होते. तर वेळेचा अपव्ययही मोठ्या प्रमाणात होतो.
या तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्यांसह रेल्वे उड्डाणपुलाची मागणी खा. मारोतराव कोवासे, स्थानिक आ. रामरतन राऊत यांना करण्यात आली. परंतु लोकप्रतिनिधींचे या समस्यांकडे दुर्लक्ष असल्याने कार्य प्रगतीपथावर नाही. त्यामुळे नागरिकांची उपेक्षा होत आहे. या उड्डाणपुलासह तालुक्याला दुपारी एक प्रवासी वाहतूक गाडी उपलब्ध व्हावी यासाठी सतत संघर्ष सुरू आहे. तर मागणीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या रेल्वे समितीलाही रेल्वे विभाग आश्वासनाच्या पलिकडे निर्णय घेताना दिसत नाही. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर अनेक प्रवासी रेल्वे गाड्या धावतात. परंतु सलग सात तास प्रतीक्षा करून प्रवाशांना वाट पाहावी लागत आहे. या तालुक्याला आमगाव ते नागपूर व नागपूर ते दुर्गपर्यंत दुपारच्या प्रवासी गाड्यांची प्रतीक्षा आहे.
नागरिकांची ही प्रतीक्षा संपविण्यासाठी कोणता लोकप्रतिनिधी धावून येतो, याचीही प्रतीक्षाच नागरिकांना आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Waiting for the train flyover were like '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.