कर वसुली अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

By Admin | Updated: February 11, 2015 01:24 IST2015-02-11T01:24:32+5:302015-02-11T01:24:32+5:30

जिल्हाधिकाऱ्यांनी कर वसुली अधिकारी म्हणून नगरपरिषदेत नायब तहसीलदार निलेश पाटील यांची नियुक्ती केली. ३१ जानेवारी रोजी नगर परिषदेला तसे आदेश प्राप्त झाले.

Waiting for tax officials | कर वसुली अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

कर वसुली अधिकाऱ्यांची प्रतीक्षा

गोंदिया : जिल्हाधिकाऱ्यांनी कर वसुली अधिकारी म्हणून नगरपरिषदेत नायब तहसीलदार निलेश पाटील यांची नियुक्ती केली. ३१ जानेवारी रोजी नगर परिषदेला तसे आदेश प्राप्त झाले. मात्र आता १० दिवस लोटले असून नायब तहसीलदार पाटील यांनी आपला पदभार स्वीकारलेलाच नाही. परिणामी मुख्याधिकारी सुमंत मोरे यांच्या माध्यमातून एकाच पथकाद्वारे कर वसुलीची मोहीम राबविली जात आहे. मात्र यामुळे पाहिजे तेवढी गती मोहीमेला लाभत नसल्याने नगरपरिषद कर वसुली अधिकाऱ्यांच्या प्रतिक्षेत आहे.
११ कोटींच्या कर वसुलीचे टार्गेट नगरपरिषदेवर होते. कर वसुलीत नगर परिषद माघारलेली असल्याने त्याचा परिणाम शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानावर पडत होता. मात्र थकबाकीचा आकडा वर्षानुवर्षे वाढतच चालल्याने यंदा जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रश्न हाताळावा लागला. कर वसुलीचे हे टार्गेट सर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार ही थांबवून ठेवले होते.
कर वसुलीसाठी नगरपरिषदेत कर वसुली पथक तयार करण्यात आले. तर मुख्याधिकारी मोरे यांनाच कर वसुलीसाठी मैदानात उतरावे लागले. मुख्याधिकारी मोरे मैदानात उतरल्याने त्याचा प्रभाव पडू लागला व कर वसुली मोहिमेला शहरात चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. हेच कारण आहे की कर वसुली पथकाच्या वसुलीचा आकडा दिवसेंदिवस चढताच आहे. थकबाकीदारांत कर वसुली मोहिमेचा धसका बसल्यामुळे रोख व चेक द्वारे वसुली तर सोडाच मात्र पोस्टे डेटेड चेकद्वारेही कर भरले जात असल्याचे चित्र आहे. तरिही कर वसुली लवकरात लवकर व्हावी यासाठी कर वसुली अधिकारी म्हणून नगर परिषदेने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे कर वसुली अधिकाऱ्यांची मागणी केली होती. जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी त्यानुसार कर वसुली अधिकारी म्हणून नायब तहसीलदार निलेश पाटील यांची नियुक्तीही केली. (शहर प्रतिनिधी)
पाटील यांनी पदभार स्वीकारलाच नाही
३१ जानेवारी रोजी नायब तहसीलदार निलेश पाटील यांची कर वसुली अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश नगरपरिषदेला प्राप्त झालेत. २ फेब्रुवारी रोजी पाटील आपला पदभार स्वीकारतील अशी संभावना मुख्याधिकारी मोरे यांनी लोकमतकडे व्यक्त केली होती. ते आल्यावर दोन पथक तयार करून मोहीम अधिक जोमात राबविली जाणार असल्याचे मोरे यांचे नियोजन होते. मात्र पाटील अद्याप रूजू झालेच नाहीत. आपल्याकडे जास्तीचे काम असल्याने रूजू होण्यास वेळ लागत असल्याचे कारण सांगीतल्याचे मोरे यांनी सांगीतले. याबाबत पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Waiting for tax officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.