केशोरीच्या पोलिसांना निवासस्थानांची प्रतीक्षा
By Admin | Updated: November 4, 2014 22:43 IST2014-11-04T22:43:28+5:302014-11-04T22:43:28+5:30
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करुन पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत वाढविली आहे. याचा प्रत्यय केशोरी येथे अल्पावधीतच

केशोरीच्या पोलिसांना निवासस्थानांची प्रतीक्षा
केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने पोलीस ठाण्यांच्या आधुनिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करुन पोलीस कर्मचाऱ्यांची हिंमत वाढविली आहे. याचा प्रत्यय केशोरी येथे अल्पावधीतच एक भव्य सुसज्ज दुमजली पोलीस ठाण्याची निर्माण झालेली वास्तु बघून येते. मात्र शासन अजूनही पोलीस कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्षच करीत असल्याचे चित्र केशोरी येथे दिसून येत आहे.
अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे सन २००० पासून नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती लहानशा इमारतीत करण्यात आली होती. मात्र आज सर्वसुविधायुक्त भव्य व सुसज्ज पोलीस ठाण्याची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत उभी आहे. मात्र त्यात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी गावात भाड्याच्या घरी राहून अपुऱ्या सुविधा असताना नोकरी करीत आहेत. डोक्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी २४ तास ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था उत्तम असणे गरजेचे असणे अपेक्षित असते. तशी व्यवस्था पोलीस ठाणे परिसरात असणे गरजेचे असते. त्यासाठी शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी शासकीय निवासस्थाने तयार करून देणे अपेक्षित आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना गावात पुरेशा प्रमाणात सुविधा उपलब्ध होत नसतानादेखील त्या ठिकाणी राहून जनतेच्या सरंक्षणाची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. केशोरीच्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी शासनाने राहण्याची सोय केली नाही. त्यामुळे तेथील पोलीस आजही निवासस्थानांच्या प्रतीक्षेत आहेत.
या पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यथेचा शासनाचे गांभीर्याने विचार करून केशोरी पोलीस ठाणे परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पक्की निवासस्थाने बांधण्यासाठी पाऊले उचलावीत. पोलीस कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था करून त्यांच्या मनातील व्यथा दूर करावी, अशी मागणी येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)