रस्त्यांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 15, 2015 00:53 IST2015-05-15T00:53:47+5:302015-05-15T00:53:47+5:30
केंद्रात व राज्यात सत्ता बदलली. मात्र ज्या विचारावर मतदारांनी सत्तारूढ सरकारला मतदान केले, त्यांची घोर निराशा झाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

रस्त्यांना ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा
आमगाव : केंद्रात व राज्यात सत्ता बदलली. मात्र ज्या विचारावर मतदारांनी सत्तारूढ सरकारला मतदान केले, त्यांची घोर निराशा झाल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. तालुक्यात ग्रामीण भागात अनेक रस्ते आहेत. यातील जास्तीत जास्त रस्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागातंर्गत येतात. मात्र आघाडी सरकारच्या काळात घरघर लागलेल्या रस्त्यांना अच्छे दिनची प्रतीक्षा असली, तरी निधी नाही हा सबळ मुद्यासमोर अधिकारी आपल्यावरची जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.
कालीमाटी, सुपलीपार, मोहगाव, कातुर्ली हा जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेला मार्ग अनेक वर्षांपासून घरघर अवस्थेत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. नागरिक जीव धोक्यात टाकून येथून जाणे-येणे करतात. मात्र अभियंता किंवा उपअभियंता यांनी रस्ता दुरूस्तीसाठी ठोस पाऊल उचलले नाही. निधी नाही हाच मुद्दा अच्छे दिनला काळीमा फासणारा आहे. जिल्हा परिषद गोंदिया येथे पक्षांतरणाचे अनेकांना वेध लागले.
कार्यकर्त्यांना खूश ठेवण्याकरिता अनेक कामांचे वाटप नेत्यांकडून करण्यात आले. बंधारे देऊन तो आपला हाच सपाटा जिल्हा परिषद गोंदिया येथे सुरू आहे. मात्र तालुक्यात जे रस्ते घरघर अवस्थेत पडले आहेत, त्यांना अच्छे दिन आणण्याकरिता कोणतेच ठोस उपाय नाही. मे महिना संपला की जूनमध्ये पावसाची सुरूवात होते.
जे रस्ते खड्डेमय झाले आहेत तेच खड्डे आणखी रूंद व खोल होऊन प्रवाशांना त्रास देणारे ठरतील. याकरिता प्रशासनाने त्वरित तालुक्यातील तसेच कालीमाटी, सुपलीपार, कातुर्ली रस्ता त्वरित दुरूस्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)