रेल्वे उडाण पुलाची प्रतीक्षा
By Admin | Updated: June 14, 2014 01:21 IST2014-06-14T01:21:00+5:302014-06-14T01:21:00+5:30
गोंदिया राज्य मार्गावर किंडगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक

रेल्वे उडाण पुलाची प्रतीक्षा
यशवंत मानकर आमगाव
आमगाव-गोंदिया राज्य मार्गावर किंडगीपार येथील मुंबई-हावडा मार्गावर असलेली रेल्वे चौकी मालवाहतूक व प्रवासी वाहनांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. या मार्गावरील रेल्वे चौकीवर उड्डाणपुलाची मागणी प्रलंबित असून जनप्रतिनिधींनी नेहमी याकडे दुर्लक्षितपणा बाळगल्याने नागरिकांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. तर प्रतीक्षा केव्हा संपणार याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. आमगाव तालुका हे औद्योगिक व्यवसायाने क्रांतिकारक वाटचाल करीत आहे. बाजारपेठेचा केंद्र असल्याने या ठिकाणी वाहनांची वर्दळ नेहमी असते. आमगाव येथील राज्य मार्गावरून सालेकसा, डोंगरगढ तर आमगाव- देवरी ते रायपूर-कलकत्ता हा महामार्ग जोडला गेला आहे. त्यामुळे माल वाहतूक व प्रवासी वाहनांची वर्दळ या मार्गावर सतत असते. परंतु या वाहनांना आमगाव-गोंदिया राज्य मार्गावर असलेल्या किंडगीपार येथील रेल्वे चौकीमुळे प्रत्येक दहा मिनिटाला थांबा घ्यावा लागतो. त्यामुळे आवश्यक असलेली सेवाही प्रभावित होते. या ठिकाणी अनेक वर्षापासून उड्डाण पुलाची मागणी जोर धरत आहे. परंतु जनप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही समस्या प्रलंबित पडून आहे. किंडगीपार येथील रेल्वे चौकीवर उड्डाण पूल व्हावे यासाठी नागरिकांनी मागणी रेटली आहे. या मागणीला सन २००६ मध्ये रेल्वे विभागाने पुढाकार घेवून सर्वेक्षणही उरकले. परंतु या उड्डाण पुलाचे घोडे कुठे अडले हे सलग सहा वर्षे लोटूनही कुणालाही माहित नाही. या रेल्वे चौकीेला ओलांडून प्रत्येक आढवड्याला दिड ते दोन लाख वाहन मार्गक्रम करतात. परंतु प्रत्येक घडीला रेल्वे मार्गावरील धावत्या गाड्यांमुळे चौकी बंद पडून या ठिकाणी वारंवार वाहनांची कोंडी निर्माण होते. तर वेळेचा अपव्यय ही मोठ्या प्रमाणात होते. या तालुक्यातील विविध प्रलंबित मागण्यांसह रेल्वे उड्डाणपुलाची मागणी खा. मारोतराव कोवासे, स्थानिक आ. रामरतन राऊत यांना करण्यात आली. परंतु जनप्रतिनिधींकडून या समस्यांकडे होत असलेला दुर्लक्षितपणा येथील उड्डाण पूल बांधकामाच्या आडी येत आहे. त्यामुळे नागरिकांची या जनप्रतिनिधींमुळे उपेक्षा कायम ठरली आहे. या उड्डाण पुलासह तालुक्याला दुपारी एक प्रवासी वाहतूक गाडी उपलब्ध व्हावी यासाठी सतत संघर्ष सुरू आहे. तर मागणीला प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे रेल्वे समितीलाही रेल्वे विभाग आश्वासनाच्या पलिकडे निर्णय घेताना दिसत नाही. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर अनेक प्रवासी रेल्वे गाड्या धावतात. परंतु सलग सात तास प्रतिक्षा करून प्रवाशांची वाट जोपासावी लागत आहे. या तालुक्याला आमगाव ते नागपूर व नागपूर ते दुर्गपर्यंत दुपारच्या प्रवासी गाड्यांची प्रतिक्षा आहे. एकंदर विकासाची वाटचाल करीत असलेले आमगाव मात्र फक्त वरवरच विकासशील दिसून येत आहे. आत मात्र समस्यांचे अंबार लागले असून त्याकडे जनप्रतिनिधींचेच दुर्लक्ष असल्याचे येथील नागरिकच आता बोलू लागले आहेत. त्यामुळे आमगावसह परिसरातील नागरिकांच्या या मागण्या कोणता विकासाचा महामेरू ठरलेला जनप्रतिनिधी धावून पूर्ण करणार याची प्रतिक्षा नागरिकांना आहे.