डॉक्टरांच्या प्रतीक्षेत रूग्ण ताटकळत
By Admin | Updated: March 27, 2015 00:36 IST2015-03-27T00:36:28+5:302015-03-27T00:36:28+5:30
ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर उपचारासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने शासनाने रावणवाडी येथे कोट्यवधी रूपयांच्या खर्चातून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली.

डॉक्टरांच्या प्रतीक्षेत रूग्ण ताटकळत
रावणवाडी : ग्रामीण भागात नागरिकांना वेळेवर उपचारासाठी आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्या या उद्देशाने शासनाने रावणवाडी येथे कोट्यवधी रूपयांच्या खर्चातून प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. मात्र या आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध तर होतच नाही. शिवाय रुग्णांना सतत डॉक्टरांचीच प्रतीक्षा करीत जिवंतपणीच मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.
सामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासन वेळोवेळी प्रयत्नशील असते. परंतु जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव नसणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सामान्य जनतेच्या आरोग्याशी काहीच देणे घेणे नाही. पूर्वीच आरोग्य केंद्रातील पदे रिक्त असल्याने त्यांचा दैनंदिन काम काजावर विपरित परिणाम होत आहे. दोन मंजूर वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉ. शिल्पा शहारे ह्या वरिष्ठांच्या विना परवाणगीने मागील दहा-बारा दिवसांपासून स्वत:च्या मर्जीने रजेवर गेल्याचे आढळून आले आहे. सदर वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी न राहता स्वत:च्या सोयीनुसार नागपूरवरुन अपडाऊन करतात. अशात रुग्णांनी उपचारासाठी कुणाकडे जावे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. आरोग्य केंद्राच्या आवारातच अधिकारी व कर्मचाऱ्यांकरिता सुसज्ज अशी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. परंतु बहुतांश निवासस्थाने रिकामेच पडून आहेत. वैद्यकीय अधिकारीच अपडाऊन करीत असल्यामुळे कर्मचारीही स्वयंमर्जीनुसार अपडाऊन करतात. अशा कार्यपद्धतीमुळे रुग्णांना हवा असलेले उपचार मिळणे कसे शक्य होणार? याची जाणिवसुद्धा वरिष्ठांना नाही.सध्या संपूर्ण राज्यात स्वाईन फ्ल्यू आजाराची धास्ती पसरली आहे. या आजारांनी मृत्यू होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक आठवड्यात हवामानात बदल होत आहे. उन्हाळा सुरु झाला असला तरी अवकाळी पावसाच्या कहराने हवामानातही फपाट्याने परिवर्तन होत आहे. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होणे स्वाभाविक आहे. मात्र आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने आरोग्य केंद्र निराधार झाले आहे. वैद्यकीय अधिकारी आपल्या कर्तव्याची जान नसल्यासारखे कृत्य करीत असल्याने याचा फटका सरळ सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. काही कर्मचारी कागद काळे करण्यातच मस्त आहेत. अशात सामान्य नागरिकांनी उपचार करावे तरी कुठे? असा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे. या प्रकाराने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (वार्ताहर)