एक लाख लोकांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा
By Admin | Updated: May 21, 2015 01:05 IST2015-05-21T01:05:43+5:302015-05-21T01:05:43+5:30
सालेकसा तालुक्यात एकूण ८६ गावे आणि सात रिठी गावं मिळून जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे.

एक लाख लोकांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा
विजय मानकर सालेकसा
सालेकसा तालुक्यात एकूण ८६ गावे आणि सात रिठी गावं मिळून जवळपास एक लाखाच्या वर लोकसंख्या आहे. परंतु या लोकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे म्हणून तालुकास्तरावर किंवा ग्राम पंचायत स्तरावर कोणतीच पाणी पुरवठा सुरू नसल्याने नागरिकांना शुध्द पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी दरवर्षी तालुक्यात उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार बळावून जीवघेणे संकट ओढवते, मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी अजूनही गांभीर्याने विचार करून पाण्याची समस्या सोडविण्यासाठी तत्पर नसल्याचे दिसून येते.
अनेक वर्षापासून सालेकसा तालुक्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी काही सुज्ञ लोकांनी नळ योजना स्थापित करून नागरिकांना शुध्द पाणी मिळावे म्हणून धावपळ करीत राहिले. काही गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर नळ योजना उभारण्यात करण्यात आल्या, परंतु ग्राम पंचायतीच्या पैसेखाऊ वृत्तीच्या पदाधिकाऱ्यांमुळे पाणी पट्टीची वसुली तर करण्यात आली, परंतु विजेचे बिल भरण्यात आले नाही. त्यातून काही ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात ग्राम पंचायती अपयशी ठरल्या. परिणामी आज काही ग्राम पंचायतींचा अपवाद वगळल्यास कोणत्याही ग्राम पंचायतीची ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू नसून थंडबस्त्यात पडून आहेत.
सालेकसा तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात पाण्यातील जीवाणूमुळे पिलीया, मलेरिया, टायफाईड, कॉलरासारखे जीवघेणे आजार वेगाने पसरतात.
या आजारांचे थैमान वाढल्यास आरोग्य विभाग सुध्दा गुडघे टेकतो व अनेक रुग्ण दगावतात. हा क्रम सालेकसासारख्या मागासलेल्या तालुक्यात दरवर्षी चालतो. हे या तालुक्याचे मोठे दुर्दैव ठरत आहे. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून दीर्घकालीन व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार विंधन विहिरी
आमदार-खासदार निधीतून किंवा इतर योजनेतून विंधन विहीर मंजूर करताना राजकारणी लोक योग्य जागेचा विचार न करता कार्यकर्त्यांच्या मर्जीनुसार नको तिथे बोअरवेल्स देतात. परिणामी अनेक बोअरवेल्स पाण्याच्या बाबतीत यशस्वी ठरत नाही. पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नसल्याने अशा बोअरव्ोल्समधून शुद्ध पाण्याऐवजी गढूळ पाणी निघते. ग्रामीण भागातील लोक नाईलाजाने तेच पाणी वापरतात आणि अनेक आजार उद्भवतात.