बोनसची प्रतीक्षा संपली; खरिपात शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 15:32 IST2021-06-30T15:29:54+5:302021-06-30T15:32:56+5:30
Gondia News खा. प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळेल असा शब्द दिला होता. तोच शब्द त्यांनी पाळला असून राज्य सरकारने बुधवारी बोनसचा पहिला टप्प्यात ४७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

बोनसची प्रतीक्षा संपली; खरिपात शेतकऱ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील खरीप हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र बोनस मिळण्यास विलंब होत झाल्याने तो मिळणार की नाही असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. पण खा. प्रफुल्ल पटेल यांनी शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळेल असा शब्द दिला होता. तोच शब्द त्यांनी पाळला असून राज्य सरकारने बुधवारी बोनसचा पहिला टप्प्यात ४७० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.
शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी भाव मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मागील खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस ५० क्विंटलपर्यंत देण्याची घोषणा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केली होती. खा. प्रफुल्ल पटेल हे शेतकऱ्यांना बोनस मिळण्यासाठी सुरुवातीपासूनच आग्रही होेते. त्यांनी गोंदिया-भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनस मिळणारच अशी ग्वाही दिली होती.
आठ दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून बोनसची रक्कम त्वरित उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. तेव्हा आठ दिवसात बोनसची रक्कम उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली होती. त्याचीच पूर्तता करीत खा. प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर बुधवारी (दि.३०) पहिल्या टप्प्यात ४७० कोटी रुपयांचा निधी बोनससाठी उपलब्ध करुन दिला आहे. तर उर्वरित निधी येत्या १५ दिवसात उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळावी यासाठी माजी आ.राजेंद्र जैन, आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे हे खा. प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत होते. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खा. प्रफुल्ल पटेल यांचे आभार मानले आहे.
पूर्व विदर्भातील पाच लाखावर शेतकऱ्यांना दिलासा
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. जवळपास ५ लाख शेतकऱ्यांनी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली होती. यासर्व शेतकऱ्यांना बोनस स्वरुपात रक्कम मिळणार असल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मदत होणार असल्याने दिलासा मिळाला आहे