वडेगावला आदर्श करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 22:18 IST2018-03-30T22:18:44+5:302018-03-30T22:18:44+5:30
वडेगाव सुंदर झाले पाहिजे ही ग्रामस्थ व माझी इच्छा आहे. लोकप्रतिनिधी चांगले असले तर गावाच्या विकासाला गती मिळते. केवळ विकासकामे न करता गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या .....

वडेगावला आदर्श करणार
ऑनलाईन लोकमत
गोंदिया : वडेगाव सुंदर झाले पाहिजे ही ग्रामस्थ व माझी इच्छा आहे. लोकप्रतिनिधी चांगले असले तर गावाच्या विकासाला गती मिळते. केवळ विकासकामे न करता गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी काम करून वडेगावला आदर्श करणार, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सडक-अर्जुनी तालुक्यातील वडेगाव-सडक येथे आमदार आदर्श ग्राम योजनेला पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते २८ मार्च रोजी फलकाचे अनावरण करून करण्यात आला. या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सभापती गिरिधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, जि.प. सदस्य शीला चव्हाण, माधुरी पाथोडे, माजी पं.स. सभापती कविता रंगारी, पद्मा परतेकी, भाजपा तालुका अध्यक्ष विजय बिसेन, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड, सरपंच हेमराज खोटेले, उपसरपंच छाया डोये यांची उपस्थिती होती.
बडोले पुढे म्हणाले, गावातील तरूण एकत्र आले तर गावाच्या विकासाला गती मिळून गावाचा विकास नक्की होईल. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेवून गावाच्या विकासाचे नियोजन करावे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा आदर्श पुढे ठेवून ग्रामस्थांनी ग्रामविकासासाठी प्रयत्न केले तर विकासाला गती मिळेल. आदर्श गाव निर्मितीसाठी ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
हत्तीमारे म्हणाले, वडेगाव हे गाव पालकमंत्र्यांनी दत्तक घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. गाव दत्तक घेतल्यामुळे वडेगावच्या विकासाला गती मिळेल. गावातील मुख्य समस्यांकडे ग्रामस्थांनी लक्ष देवून त्या सोडविण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा. ग्रामस्थांनी सहकार्य केले तर गाव नक्कीच आदर्श होईल, असे त्यांनी सांगितले.
कठाणे म्हणाले, वडेगाव हे गाव आमदार आदर्श ग्राम योजनेत घेण्यात आले आहे. वडेगावचे पालकत्व पालकमंत्र्यांनी स्वीकारल्यामुळे या गावाच्या समस्या सोडविण्यास मदत होईल. ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्र माला ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ब्राम्हणकर, सुरेश भेंडारकर, संजय मेंढे, अनिता मेंढे यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक विठ्ठलराव कठाणे, बळीराम मेंढे, देवराव मुनिश्वर, श्रीमत मुनिश्वर, बाबुराव मेंढे, कंठीजी ब्राम्हणकर, वामन मुनिश्वर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरूवातीला पालकमंत्री बडोले यांनी वडेगाव-सडक प्रवेशद्वाराजवळ आमदार आदर्श ग्राम योजनेच्या फलकाचे अनावरण केले. यानिमित्ताने सदर कार्यक्र मात त्यांच्या वाढिदवसानिमित्त केक कापला. प्रास्ताविक सरपंच हेमराज खोटेले यांनी केले. संचालन गिरीपाल फुले यांनी केले. आभार मुख्याध्यापक देशमुख यांनी मानले.