मतदानात महिलांचीच आघाडी!

By Admin | Updated: July 2, 2015 01:46 IST2015-07-02T01:46:14+5:302015-07-02T01:46:14+5:30

‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून बाहेर पडत असलेल्या महिलांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या मतदानातही आघाडी घेतली आहे.

Voting of women in the voting! | मतदानात महिलांचीच आघाडी!

मतदानात महिलांचीच आघाडी!

अंतिम टक्केवारी ७५.७४ : नक्षलग्रस्त क्षेत्रातही मतदानासाठी झुंबड
गोंदिया : ‘चूल आणि मूल’ या संकल्पनेतून बाहेर पडत असलेल्या महिलांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या मतदानातही आघाडी घेतली आहे. जिल्हाभरात पुरूषांपेक्षा २५४८ महिलांनी जास्त मतदान केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी ५० टक्के आरक्षण मिळण्याचा हा परिणाम आहे, की आपल्या हक्काबाबत महिला अधिक जागरूक झाल्या हा संशोधनाचा विषय ठरणार आहे.
दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. प्राप्त अंतिम टक्केवारी ७५.७४ झाली आहे. यात नक्षलग्रस्त देवरी तालुका सर्वात आघाडीवर असून तिथे मतदानाचे प्रमाण ७८.२१ टक्के आहे. गोरेगाव तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ७३.०६ टक्के मतदान झाले आहे.
मंगळवारी मतदानाच्या दिवशीचे चित्र पाहता ग्रामीण भागात सर्वच केंद्रांवर महिलांची गर्दी जास्त दिसत होती. अगदी नवतरुण मतदारांपासून तर शंभरी गाठलेल्या वृद्धांनीही उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक रिंगणात पहिल्यांदाच ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव असल्यामुळे मतदानात महिलांचा उत्साह वाढला असल्याचे प्राथमिक अंदाजात दिसून येत आहे.
जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव, सडक-अर्जुनी आणि गोरेगाव हे तालुके वगळता इतर चार तालुक्यांमध्ये मतांचे दान करण्यात पुरूषांपेक्षा महिला आघाडीवर आहेत. जिल्ह्यात ४ लाख १४ हजार ३०२ पुरूष आणि ४ लाख ९ हजार १३१ महिला मतदार असे एकूण ८ लाख २३ हजार ४३४ मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख १३ हजार १२७ महिलांनी आणि ३ लाख १० हजार ५७९ पुरूषांनी मतदानाचा हक्क बजावला.
नक्षलग्रस्त भागात मतदानासाठी तैनात कर्माचाऱ्यांना सर्व प्रकारची सुरक्षा देण्यात आली होती. सालेकसा तालुक्यात दरेकसा बिजेपार आणि पिपरीया येथे बेस कॅम्प ठेवले होते. जवळपास ३७ मतदान पथकांना २९ जूनच्या रात्रीचा मुक्काम सशस्त्र दूरक्षेत्रस्थित बेस कॅम्पवर देण्यात आला. तसेच काही मतदान पथक सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये थांबून ३० जूनला सकाळी मतदान केंद्रांवर पोहोचले. गोरेगाव आणि सालेकसा तालुक्यात काही मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रकार सोडल्यास कुठेही कोणती गडबड झाली.
संपूर्ण निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना उपजिल्हा निवडणूक अधिकारी उमेश काळे व सर्व एसडीओ आणि तहसीलदारांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)
नक्षलग्रस्त भागात चांगला प्रतिसाद
विशेष म्हणजे नक्षलग्रस्त असलेल्या २९८ केंद्रांवर दुपारी ३ पर्यंतच मतदानाची वेळ ठेवली होती. तरीही त्या केंद्रांवर नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत मतदानाची आकडेवारी कमी पडू दिली नाही. त्यात आमगाव, देवरी व सालेकसा या तिन्ही तालुक्यातील संपूर्ण मतदान केंद्र तसेच अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील झाशीनगर, गोठणगाव, बाराभाटी, ताडगाव, महागाव, केशोरी, भरनोली, आणि सडक-अर्जुनी तालुक्यातील चिखली, कोकणा जमी, शेंडा व बाम्हणी खडकी येथील मतदान केंद्रांवर दुपारी ३ पर्यंत मतदान झाले. गोरेगाव तालुक्यात सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असतानाही तिथे सर्वात कमी मतदान झाले आहे.
स्ट्राँग रूममधील ईव्हीएमला खडा पहारा
मतदानानंंतर उमेदवारांचे भाग्य ठरविणाऱ्या ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक्स व्होटींग मशिन) आठही तालुक्यांच्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहोत. त्या स्ट्राँग रूमला सील करण्यात आले असून त्याबाहेर सशस्त्र पोलिसांचा २४ तास पहारा ठेवण्यात आला आहे. या पहाऱ्यासाठी राखीव पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. गोंदियातील ईव्हीएम जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये आहेत. मतमोजणीच्या दिवशीपर्यंत (दि.६) त्या ईव्हीएम अशाच पद्धतीने कडक पहाऱ्यात राहणार आहेत.

Web Title: Voting of women in the voting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.