मतदार ओळखपत्रे कचऱ्यात

By Admin | Updated: January 5, 2015 23:05 IST2015-01-05T23:05:03+5:302015-01-05T23:05:03+5:30

जिवंत अर्भकाला फेकण्याच्या प्रकाराने गोंदियात खळबळ उडाली असताना सोमवारी गोंदियात मतदार ओळखपत्रे चक्क कचऱ्यात फेकण्याचा प्रकाराने प्रशासकीय यंत्रणेला हादरवून सोडले आहे.

Voters' identity card in the trash | मतदार ओळखपत्रे कचऱ्यात

मतदार ओळखपत्रे कचऱ्यात

गोंदिया : जिवंत अर्भकाला फेकण्याच्या प्रकाराने गोंदियात खळबळ उडाली असताना सोमवारी गोंदियात मतदार ओळखपत्रे चक्क कचऱ्यात फेकण्याचा प्रकाराने प्रशासकीय यंत्रणेला हादरवून सोडले आहे. गोंदिया तहसील कार्यालयाचा हा प्रताप असल्याचे उघड झाले आहे.
शहरातील संजय नगर परिसरातील एका प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार ओळखपत्र व मतदार याद्या बेवारस मिळून आल्या आहेत. सोमवारी (दि.५) सकाळी ८ वाजतादरम्यान उघडकीस आलेल्या या प्रकाराने शासकीय यंत्रणेचे मात्र टेंशन वाढविले आहे.
येथील तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम करावयाचे असल्याने मागील दोन महिन्यांपासून जुन्या इमारतीला पाडण्याचे काम सुरू आहे. या जुन्या इमारतीचा मलबा मागील १५ दिवसांपासून संजय नगर परिसरातील कव्वाली मैदानजवळील राकेश टेंभरे यांच्या प्लॉटमध्ये टाकला जात आहे. या प्लॉटलाच लागूनन सार्वजनिक शौचालय आहे. सोमवारी (दि.५) सकाळी परिसरातील काही नागरिक शौचालयाला गेले असता त्यांना मलब्यात मतदार कार्ड व मतदार याद्या दिसून आल्या. कचऱ्यात मतदार ओळखपत्र गेलेच कसे या प्रश्नाने अचंबित झालेल्या नागरिकांनी ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरविली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी एन.के.लोणकर, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार संजय पवार व परिसराचे पटवारी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता सुमारे पाच हजार मतदार कार्ड, मतदार याद्या व हलफनामे मलब्यात आढळले. अधिकाऱ्यांनी ते सर्व कागदपत्र ताब्यात घेतले.
(शहर प्रतिनिधी)
तहसील कार्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
विशेष म्हणजे, नुकत्याच घेण्यात आलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांत कित्येकांना मतदार ओळखपत्र मिळाले नसल्याने मतदानापासून वंचित रहावे लागले. दुसरीकडे हजारोंच्या संख्येत मलब्यात हे कार्ड सापडल्याने नागरिकांत एकच रोष दिसून येत आहे. शिवाय मतदारांच्या जागृतीसाठी व मतदानासाठी शासनाकडून जाहीरातींवर लाखो रूपये खर्च केले जातात. दुसरीकडे येथील तहसील कार्यालय प्रशासनाकडून असा बेजबाबदार कारभार केला जात असल्याने शासकीय यंत्रणा किती ईमानेइतबारे काम करीत आहे याची प्रचिती येते. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Voters' identity card in the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.