मतदार हा लोकशाहीचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:47 IST2021-02-05T07:47:05+5:302021-02-05T07:47:05+5:30
गोंदिया : लोकशाही बळकटीकरणासाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक नागरिक ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत त्या सर्व ...

मतदार हा लोकशाहीचा आधार
गोंदिया : लोकशाही बळकटीकरणासाठी मतदारांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रत्येक नागरिक ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत त्या सर्व नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून मताधिकार बजावून लोकशाहीला बळकट करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी (दि.२५) राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, भा.प्र.से. परिविक्षाधीन अधिकारी सावन कुमार, एनएमडी कॉलेजचे प्राध्यापक डॉ. शशिकांत चौरे, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर बन्सोड उपस्थित होते. प्रारंभी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निर्वाचन आयुक्त सुनील अरोडा यांचा व्हिडिओ संदेश प्रसारित करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांनी, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नवमतदारांना कर्तव्य व निष्ठा यांचे पालन करून मतदानाचा हक्क बजावून योग्य प्रतिनिधींची निवड करून लोकशाहीला सशक्त बनवून जागरूक मतदार असल्याची भूमिका बजावणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविक केले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी संचालन केले. आभार आर. एस. पटले यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, अपर तहसीलदार अनिल खडतकर, नायब तहसीलदार राजाराम पटले, सहायक कोषागार अधिकारी एल. एच. बाविस्कर, पोलीस निरीक्षक कदम, अमित पाथोडे, अशोक मस्करे व दिनेश काळसर्पे उपस्थित होते.
---------------------
नवीन मतदारांना मतदान ओळखपत्राचे वाटप
राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सीमा तुरकर, रोहित शेंद्रे, अनुप लिल्हारे, सुरेंद्र चिखलोंडे, प्रियंका चिखलोंडे, हेमा बेलगे, दीप बिसेन, निकुंज भेलावे, संस्कार अग्रवाल, प्रज्ञा पारधी व निकिता चौधरी या नवमतदारांना नवीन मतदार ओळखपत्र प्रदान करण्यात आले.