बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दर्शन
By Admin | Updated: March 7, 2016 01:37 IST2016-03-07T01:37:48+5:302016-03-07T01:37:48+5:30
तालुक्यातील सर्वात मोठे शिवालय म्हणून सर्वदूर ओळख असलेले त्रिलोकेश्वरधाम हलबीटोला येथे भगवान शंकराचे शिवलिंगयुक्त भव्य मंदिर आहे.

बारा ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दर्शन
सर्वात मोठे शिवालय : त्रिलोकेश्वरधाम हलबीटोला येथे भाविकांची लागणार रिघ
विजय मानकर सालेकसा
तालुक्यातील सर्वात मोठे शिवालय म्हणून सर्वदूर ओळख असलेले त्रिलोकेश्वरधाम हलबीटोला येथे भगवान शंकराचे शिवलिंगयुक्त भव्य मंदिर आहे. ५१ फूट उंचीचा त्रिफळायुक्त त्रिशूल आणि त्यातील द्वादश ज्योतिर्लिंग असलेल्या शिवालयात एकाच ठिकाणी एकाच वेळी १२ शिवलिंगाचे दर्शन घडवून येणारे आहे. त्यामुळे येथे वर्षभर शिवभक्तांचे येणे-जाणे सुरू असते. तसेच शिवरात्रीला लाखोच्या घरात भाविक येऊन द्वादश ज्योतिर्लिंगाचे दर्शन करुन स्वत:ला पुण्यवान समजून घेतात. यंदा या ठिकाणी शिवरात्री पर्वानिमित्त पाच दिवसीय शिवपुराण प्रवचन आणि अनवरत हवन कुंड सुरू राहणार असून प्रत्येक भाविकाला साखला अर्पण करण्याचे लाभ मिळणार आहे. त्यामुळे यंदा येथे भाविकांची एकच गर्दी कायम राहणार आहे.
सालेकसा रेल्वे स्टेशनपासून जेमतेम दोन कि.मी. पूर्वेस असलेल्या हलबीटोला येथील पहाडीवर असलेल्या त्रिलोकेश्वरधाम या धार्मिक पर्यटन स्थळाची स्थापना १९६९ ला बाबा त्यागी ब्रिजलाल महाराज यांनी केली. परंतु या स्थळाला दीड वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. या ठिकाणी आधीपासूनच भगवान त्रिलोकीनाथ यांचे प्राचीन देवस्थान स्थापित होते, म्हणून या ठिकाणी स्थापित मंदिराला त्रिलोकेश्वरधाम असे नाव देण्यात आले.
बाबा ब्रिजलाल हे अमरकंटक येथे जाऊन नर्मदा नदीची परिक्रमा करुन हलबीटोला येथे परतले आणि महाशिवरात्रीच्या दिवशी येथील पहाडीवर गोंगल्याच्या झाडाखाली शिवालयाची स्थापना केली. त्यानंतर दरवर्षी या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी वाढू लागली. मागील ४७ वर्षांपासून चालत असलेल्या महाशिवरात्री पर्वाचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत गेले. ब्रिजलाल बाबा यांच्या मृत्यूनंतर हलबीटोला येथील कारुजी महाराज यांनी येथील महोत्सवाची परंपरा कायम ठेवत पुढे प्रचार-प्रसार करण्यात मोलाची भूमिका निभावली. त्यानंतर भास्करराव भेंडारकर यांनी या शिवालय परिसराचा विकास करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आज या ठिकाणी त्रिलोकेश्वरधाम मंदिर यासह ५१ फूट उंचीचा त्रिफळा हा त्रिशूल शाही स्वरुपात उभा असून या ठिकाणच्या मुख्य आकर्षणाचे प्रतिक आहे.
त्या त्रिशुलाखाली शिवालय स्थापित असून भारताच्या विविध राज्यात स्थापित असलेले द्वादश ज्योतिर्लिंगाचे प्रतिरुप बारा शिवलिंग एकाच ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करुन स्थापित करण्यात आले आहे. यात सोमनाथ ज्योतिर्लिंग (गुजरात), मल्लिकार्जुन स्वामी (आंध्र प्रदेश), महाकालेश्वर (मध्य प्रदेश), ओंकारेश्वर (मध्य प्रदेश), केदारनाथ (उत्तराखंड), भीमाशंकर (महाराष्ट्र), काशी विश्वनाथ मंदिर (उत्तर प्रदेश), त्र्यंबकेश्वर शिव मंदिर (महाराष्ट्र), बैद्यनाथ मंदिर (झारखंड), औंढा नागनाथ मंदिर (महाराष्ट्र), रामेश्वर (तमिळनाडू), घृश्नेश्वर (महाराष्ट्र) या बारा ज्योतिर्लिंगाचे प्रतीक या ठिकाणी स्थापित असून या सर्व शिवलिंगाची परिक्रमा करण्याची संधी या ठिकाणी लाभते. त्यामुळे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थळ बनले आहे.
येथे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील शिवभक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. मागील दोन दशकांपासून या ठिकाणी महाशिवरात्रीचे औचित्य साधून पाच दिवसांचे शिव महापुराणावर आधारित आध्यात्मिक प्रवचन आयोजित केले जात आहेत. यात उत्तर भारतातील उत्तराखंड, काशी, अमरकंठक, चित्रकूट, हरिद्वार, परमेश्वरधाम, चुडामणधाम व इतर ठिकाणाचे प्रसिद्ध प्रवचनकार, साधू आणि साध्वी यांनी आपल्या वाणीतून शिवमहिमा सादर केली आहे. त्यात शास्त्रीय संगीताची साथ रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरत असते.
यंदा येथे ५ मार्चपासून पुष्पेंद्र शास्त्री महाराज यांचे प्रवचन सुरू झाले असून ते ९ मार्चपर्यंत चालणार आहे. या दरम्यान महायज्ञ आणि महाप्रसादाचे विशाल आयोजन या ठिकाणी होत आहे. तसेच येथे भव्य त्रिशूल ५१ फूट उंच, १५ फूट उंच भगवान शंकराची मूर्ती, ५ फूट उंच नंदी या शिवाय बाबा धुनी, हनुमान मंदिर, भैरव मंदिर, नाग मंदिर, बाबा ब्रिजलाल समाधी, कारुजी बाबा स्मारक असून मंदिर परिसरालगत निसर्गरम्य जंगल परिसर, स्वच्छ सुंदर तलाव येथील पहाडीच्या पायथ्याला सुशोभित करणारा वाटतो.
त्यामुळे भाविकांना हे नैसर्गिक स्थळ आपल्याकडे आपोआपच खेचून आणते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गाडीत बसूनच ५१ फूट उंच त्रिशुळाचे हमखास दर्शन घडून येतात. त्यामुळे त्यांनासुद्धा या स्थळाला भेट देण्याची इच्छा जागृत होते.