तीन महिन्यात १६ हजार वन पर्यटकांची भेट

By Admin | Updated: September 27, 2014 01:48 IST2014-09-27T01:48:52+5:302014-09-27T01:48:52+5:30

राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात वनपर्यटकांचा ओढा दरवर्षी वाढत आहे. आता नागझिरा, नवीन नागझिरा अभयारण्य

A visit to 16 thousand forest tourists in three months | तीन महिन्यात १६ हजार वन पर्यटकांची भेट

तीन महिन्यात १६ हजार वन पर्यटकांची भेट

देवानंद शहारे गोंदिया
राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्यात वनपर्यटकांचा ओढा दरवर्षी वाढत आहे. आता नागझिरा, नवीन नागझिरा अभयारण्य आणि नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्याने पर्यटकांचे आकर्षण आणखी वाढले आहे. गेल्या एप्रिल ते जून या तीन महिन्यात १६ हजार १२० वन पर्यटकांनी जिल्ह्यात हजेरी लावली. तर आर्थिक वर्ष २०१३-१४ मध्ये ३८ हजार ५७९ वनपर्यटक दाखल झाल्याची नोंद वन्यजीव विभागाने घेतली आहे.
सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात नागझिरा अभयारण्याला एकूण १७ हजार ०९२ पर्यटकांनी, नवीन नागझिरा अभयारण्यास एकूण १९ हजार २७४ पर्यटकांनी तर नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व अभयारण्यास एकूण दोन हजार २१३ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद आहे. अशा एकूण एकूण ३८ हजार ५७९ पर्यटकांकडून सहा लाख ५१ हजार ६७० रूपयांचे प्रवेश शुल्क जमा झाले आहे. या तिन्ही पर्यटनस्थळी वर्षभरात एकूण सहा हजार ६४३ वाहनांनी प्रवेश केला. त्याद्वारे तीन लाख २१ हजार ११५ रूपयांचे शुल्क मिळाले. अशाप्रकारे वर्षभरात वन्यजीव विभागाला एकूण नऊ लाख ७२ हजार ७८५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी नागझिऱ्याच्या पिटेझरी येथे आठ तंबू लावण्यात आले आहेत. पिटेझरी गेटजवळ पर्यटकांसाठी २० सिट्स असलेले पर्यटक वाहन, चोरखमारा येथे ८ सिट्सचे पर्यटक व नवेगावबांध येथे ३० सिट्स असलेल्या पर्यटन वाहनांची सोय करण्यात आली आहे. या शिवाय पर्यटकांच्या सोयी-सुविधेसाठी एफडीसीएममार्फत सेवा पुरविली जाते. सदर तिन्ही स्थळे १ आॅक्टोबरपासून पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असून ३० गाईड्सची व्यवस्था करण्यात आल्याचे विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) गोंदियाचे एस.एस. कातोरे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्हा पर्यटन समितीकडून जिल्ह्यातील १० ठिकाणी पोस्टर्स-बॅनर्स लावण्याची कार्यवाही करणे प्रस्तावित आहे. यात बालाघाट मार्ग जिल्हा आगमन मार्गावर, देवरी राजनांदगाव चेक पोस्ट, भंडारा जिल्हा आगमन मार्ग, कोहमारा राष्ट्रीय मार्ग, तुमसर मार्ग जिल्हा आगमन, गडचिरोली मार्ग जिल्हा आगमन, नवेगावबांध पर्यटन स्थळ, जिल्हाधिकारी कार्यालय, चोरखमारा गेट (नागझिरा) व जयस्तंभ चौक गोंदिया या स्थळांचा समावेश आहे.
नागझिरा, नवीन नागझिरा व नवेगावबांध या स्थळांचा अंतर्भाव टायगर रिझर्व प्रोजेक्टमध्ये होतो. एप्रिल ते जून २०१४ या तीन महिन्यांत या तिन्ही स्थळांच्या पर्यटनातून एकूण सात लाख १२ हजार ६५४ रूपये मिळाल्याची नोंद वन व वन्यजीव विभागाने केली आहे. या टायगर रिझर्व प्रोजेक्टला सन २०१४ एप्रिल, मे व जून महिन्यांत एकूण १६ हजार १२० पर्यटकांनी भेटी दिल्या. त्यांच्याकडून प्रवेश शुल्कच्या स्वरूपात चार लाख १८ हजार २४५ रूपये, प्रवेश केलेल्या दोन हजार ६७४ वाहनांपासून दोन लाख १८ हजार ४२५ रूपये तर वापरण्यात आलेल्या ९४९ कॅमेऱ्यांपासून ७५ हजार ९८४ रूपयांचे उत्पन्न मिळाले. अशाप्रकारे सदर तीन महिन्यांत टायगर रिझर्व प्रोजेक्टला एकूण सात लाख १२ हजार ६५४ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले.

Web Title: A visit to 16 thousand forest tourists in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.