जि.प.च्या आवारात ‘विरूगिरी’
By Admin | Updated: March 16, 2017 00:17 IST2017-03-16T00:17:24+5:302017-03-16T00:17:24+5:30
रोजगार हमीच्या कामाचा पुरेसा मोबदला मिळावा आणि मस्टर रजिस्टर गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

जि.प.च्या आवारात ‘विरूगिरी’
गोंदिया : रोजगार हमीच्या कामाचा पुरेसा मोबदला मिळावा आणि मस्टर रजिस्टर गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी गोरेगाव तालुक्यातील कमरगावच्या वृद्ध मजुराने चक्क जिल्हा परिषदेच्या आवारातील झाडावर विरूगिरी केली. दुपारी तब्बल साडेतीन तासपर्यंत त्याला झाडावरून खाली उतरविताना जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.
लिखिराम काशिराम राऊत (६५) असे त्या मजुराचे नाव आहे. रोजगार हमीच्या कामात कमी मजुरी देऊन आपल्यावर अन्याय झाला, सतत लढा देऊनही अधिकारी लक्ष देत नाही, असे सांगत राऊत यांनी सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी दुपारी गोंदियातील जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठले. अधिकाऱ्यांची भेट घेतली. पण समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे दुपारी १ वाजताच्या सुमारास राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोरील ध्वजस्तंभासमोर रस्याकडील बाजुने असलेल्या झाडावर धाव घेतली. काही वेळातच ते झाडावर उंचावर जाऊन बसले. आपल्यावर अन्याय करणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करा आणि आपल्याला कामाचा पुरेपूर मोबदला द्या, त्याशिवाय आपण खाली उतरणार नाही, असे म्हणत त्यांनी झाडावर ठाण मांडले.
हा प्रकार पाहून जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर.एल.पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (रोहयो) नरेश भांडारकर यांनी तत्काळ पोलीस आणि फायर ब्रिगेडला बोलविले. मात्र गोंदिया न.प.चे फायर ब्रिगेड कुचकामी ठरले. त्यानंतर जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी १५ दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन दिले. पण तरीही राऊत मानले नाही. शेवटी ग्रामीणचे ठाणेदार पाटील, प्रहारचे प्रमोद गजभिये व पत्रकारांनी तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगितल्यामुळे ४.३० वाजता ते खाली उतरले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.(जिल्हा प्रतिनिधी)
काय आहे प्रकरण?
लिखिराम राऊत यांनी २०१२ मध्ये रोहयोतून रोपवाटिकेचे काम केले. त्यावेळी १४५ रुपये मजुरी असताना त्यांच्या खात्यात केवळ ८० रुपये प्रमाणे पैसे जमा झाले. आपल्याला पुरेपूर मोबदला मिळावा म्हणून त्यांनी बिडीओ, तहसीलदारांपासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दाद मागितली, परंतू न्याय मिळाला नाही. आता बिडीओ तेव्हाचे मस्टर रजिस्टरच गायब झाल्याचे सांगत आहेत. जर तसे झाले असेल तर पोलीस तक्रार का करीत नाही? असा रोहयो मजूर राऊत यांचा सवाल आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे.
तीन सदस्यीय समिती नेमणार
लिखिराम राऊत यांना कसेबसे खाली उतरविल्यानंतर त्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या कक्षात नेण्यात आले. यावेळी चर्चा करताना या प्रकरणाची तीन सदस्यीय समितीमार्फत चौकशी करून राऊत यांच्यावर खरोखर अन्याय झाला का याची तपासणी केली जाईल, असे आश्वासन सीईओ डॉ.पुलकुंडवार यांनी दिले.