जिल्हा परिषदेकडून वनकायद्याचे उल्लंघन
By Admin | Updated: September 2, 2016 23:58 IST2016-09-02T23:58:51+5:302016-09-02T23:58:51+5:30
तिरोडा तालुक्यातील चुरडी (गराडा) येथील वनजमिनीवर असलेल्या तलावाचा अनधिकृतपणे ताबा घेऊन जिल्हा परिषदेने त्याला तलावाचा

जिल्हा परिषदेकडून वनकायद्याचे उल्लंघन
चुरडी वनतलाव प्रकरण : अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे करताहेत लिलाव
मनोज ताजने गोंदिया
तिरोडा तालुक्यातील चुरडी (गराडा) येथील वनजमिनीवर असलेल्या तलावाचा अनधिकृतपणे ताबा घेऊन जिल्हा परिषदेने त्याला तलावाचा मत्स्यपालन संस्थेला वारंवार लिलाव केल्याचे दिसून येत आहे. वनकायद्याचे उल्लंघन करणारा हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू असताना वनविभागाने त्याकडे दुर्लक्ष कसे केले? हा प्रश्न मात्र अनाकलनिय आहे.
केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर वनविभागाने मे २०१६ मध्ये झुडूपी जंगलात येणाऱ्या त्या वनतलावाची जागा तिरोडा येथील अदानी वीज प्रकल्पाला हस्तांतरित केली. मात्र त्या जमिनीच्या मालकीसंदर्भात जिल्हा परिषदेकडे कोणतीही कागदपत्रे नसताना केवळ परंपरेने चालत आलेल्या प्रक्रियेचा भाग म्हणून जिल्हा परिषदेकडून त्या तलावावर मालकी हक्क सांगितला जात असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे अदानी प्रकल्प व्यवस्थापनाने त्या जागेच्या वनविभागाकडील मालकी हक्कापासून तर अदानी प्रकल्पाला हस्तांतरित केल्यापर्यंतचे सर्व कागदपत्रे, ज्यात टीएलआर प्रमाणपत्र, हस्तांतरण प्रमाणपत्र, पी-१ प्रमाणपत्र, १९५७-५८ चे निस्तार अधिकार आणि अधिकार अभिषेक आदी सर्व संबंधितांसमोर सादर केले. त्यावरून महसूल विभाग व वनविभागचे अधिकारी त्या जागेवर आता अदानी प्रकल्पाचा अधिकार असल्याचे मान्य करीत आहेत.
विशेष म्हणजे त्या वनतलावाच्या ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयोग होत असला तरी अधिकृतपणे कोणीही शेतकरी त्या पाण्यासाठी पाणीपट्टी भरीत नव्हते. ती वसूल करण्याचा अधिकारही कोणाला नव्हता. मात्र आता अदानी प्रकल्पाच्या वतीने त्या जागेचा ताबा मिळाल्यानंतर जागेचे सपाटीकरण करण्यास सुरूवात केली असता परिसरातील शेतकरी व मत्स्योत्पादनासाठी त्या वनतलावाचा उपयोग करणाऱ्या संस्थेकडूनही ओरड करण्यात आली. त्यात जिल्हा परिषदेने सुरात सूर मिसळून आपला हक्क दाखविण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार वनकायद्याचे उल्लंघन करणारा असून त्यासाठी वनकायद्यानुसार जिल्हा परिषदेवर कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.