उत्साहाच्या भरात केला नियमभंग
By Admin | Updated: May 18, 2014 23:42 IST2014-05-18T23:42:10+5:302014-05-18T23:42:10+5:30
लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि विजयी झालेल्या नाना पटोले यांना आम्ही तुमचे किती शुभचिंतक आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे शहरात दिसून येत आहे.

उत्साहाच्या भरात केला नियमभंग
गोंदिया : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि विजयी झालेल्या नाना पटोले यांना आम्ही तुमचे किती शुभचिंतक आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे शहरात दिसून येत आहे. विजयाच्या याच नादात शहरातील काही शुभचिंतकांनी होर्डिंग्स लावून पटोलेंना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्साहाच्या भरात या शुभचिंतकांनी गांधीजींच्या पुतळ्यासमोरच होर्डिंग्स लावून टाकले. यातून मात्र नानांच्या या शुभचिंतकांच्या हातून कायदेभंगच झाल्याचे शहरात बोलले जात आहे. शहरात चौकाचौकांत असलेल्या महापुरूषांच्या पुतळ्याच्या परिसरात किंवा त्यांच्या पुतळ्याच्या अवती-भोवती होर्डिंग्स लावू नये, असे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे तसा निर्णय पालिकेच्या सदस्यांनी मागील कित्येक वर्षांपूर्वी घेतला आहे. शहरातील सर्वसामान्य माणसालासुद्धा याबाबत माहिती आहे. असे असतानाही मात्र नाना पटोलेंच्या काही राजकारणी शुभचिंतकांना या बाबीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, लोकसभा निवडणुकीचे निकाल सुरू झाल्यापासूनच नाना पटोले आघाडीवर होते. ते ही निवडणूक नक्की सर करणार हे लक्षात येताच त्यांच्या चाहत्यांनी आपापले होर्डिंग्स तयार करण्यास व चांगली जागा बघून त्यांना लावण्यास सुरूवात करून घेतली होती. निकालाची अधिकृत घोषणा झाली नव्हती तरीही शहर दुपारीच नानामय झाल्याचे ठिकठिकाणच्या होर्डिंग्सवरून दिसत होते. अशात एक होर्डिंग गांधी पुतळ्यालगत लावण्यात आले आहे. या होर्डिंगमुळे गांधीजींचा पुतळा मात्र लपून गेला आहे. रस्त्याने येणार्या-जाणार्यांना पुतळा दिसतच नाही. पटोलेंच्या विजयाचा आनंद या होर्डिंग्समधील त्यांच्या या चाहत्यांनी व्यक्त केला. ही एक चांगली बाब असली तरी, कायद्याचा भंग करून केलेला हा प्रकार मात्र काही सुज्ञ नागरिकांनी टिपून घेतला आहे. यामुळेच उत्साहाच्या भरात कायदा भंग करण्यात आल्याचेही नागरिक बोलू लागले आहेत. (शहर प्रतिनिधी)