गावकऱ्यांनीच पकडली गावठी दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:40+5:302021-03-29T04:16:40+5:30
बिरसी-फाटा : तिरोडा पोलिसांनी शहर व परिसरात गावठी दारू पकडली असून अवैधरीत्या दारू काढणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ...

गावकऱ्यांनीच पकडली गावठी दारू
बिरसी-फाटा : तिरोडा पोलिसांनी शहर व परिसरात गावठी दारू पकडली असून अवैधरीत्या दारू काढणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सपाटा लावला आहे. तरी सुकडी परिसरात अवैधरीत्या दारू काढून विकणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नव्हती. शेवटी गावकऱ्यांनीच पुढाकार घेत गावठी दारू पकडून अवैध दारूची विक्री करणाऱ्यांना मोठी चपराक लगावली आहे.
बोदलकसा गावात दारूबंदी असली तरी तेथेही अवैधरीत्या दारूची विक्री होत होती. गावकऱ्यांनी यावर पाळत ठेवून शनिवारी (दि.२७) बोदलकसा जंगल परिसरात सुरू असलेल्या हातभट्टीची माहिती तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी यांना दिली. त्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अशोक केंद्रे, हवालदार आनंद दामले, शिपाई विजय बिसेन यांना घटनास्थळी पाठविले असता दारू गाळणाऱ्या व्यक्ती पळून गेल्या. मात्र पोलिसांनी गावकऱ्यांसमक्ष येथे सुरू असलेली हातभट्टी उधळून लावत तीन हजार रुपये किमतीचे हातभट्टीचे साहित्य, ९० हजार रूपये किमतीच्या २ मोटारसायकल, सात हजार रूपये किमतीची मोहफुलाची ७० लिटर दारू, ९० हजार रूपये किमतीचा ९०० किलो सडवा मोहा असा एकूण एक लाख ९० हजार रुपयांचा माल जप्त केला.