निरंतर स्वच्छतेचा मंत्र गावकऱ्यांनी जपला पाहिजे
By Admin | Updated: March 25, 2017 01:36 IST2017-03-25T01:36:50+5:302017-03-25T01:36:50+5:30
प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्त्व समजावून घेवून व्यक्तिगत जीवनाबरोबरच सामाजिक जीवनात सुद्धा स्वच्छता राखावी.

निरंतर स्वच्छतेचा मंत्र गावकऱ्यांनी जपला पाहिजे
उषा मेंढे : ग्राम स्वच्छता समितीकडून गांधीटोला गावाची पाहणी
ेसाखरीटोला : प्रत्येकाने स्वच्छतेचे महत्त्व समजावून घेवून व्यक्तिगत जीवनाबरोबरच सामाजिक जीवनात सुद्धा स्वच्छता राखावी. स्वच्छतेचे विविध फायदे असून गावागावांत स्वच्छता मोहीम राबविली जावी. यासाठी शासनाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले असून स्वच्छता ही एका दिवसासाठी नाही तर निरंतर असावी म्हणून निरंतर स्वच्छतेचा मंत्र गावकऱ्यांनी जपला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हापरिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
गांधीटोला येथे मंगळवारी (दि.२१) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता जिल्हास्तरीय चमूने भेट देत पाहणी केली असता त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प. सदस्य लता दोनोडे, सभापती हिरालाल फाफनवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे, पत्रकार शर्मा, समाजकल्याण अधिकारी रामटेके, खंड विकास अधिकारी खांडे, सरपंच रेखा फुंडे, माजी पं.स. सभापती तुकाराम बोहरे, सातगावच्या सरपंच संगिता कुसराम, डॉ. सुषमा देशमुख, जेठभावडा ग्रामपंचायतचे सरपंच रहांगडाले, उपसरपंच भूमेश्वर मेंढे उपस्थित होते.
गावात तपासणी चमू दाखल होताच फटाके फोडून तसेच पुष्पांचा वर्षाव करुन स्वागत करण्यात आले. जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. उपसरपंच भूमेश्वर मेंढे यांनी प्रास्ताविकातून गांधीटोला गाव विकासाच्या दिशेने करीत असलेल्या वाटचालींचा आढावा मांडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनी, स्वच्छतेचे महत्व पटवून देताना उघड्यावर शौचास जाणे ही निंदनीय बाब आहे. यामुळे अनेक आजार जडतात. केवळ चमू येणार आहे म्हणून स्वच्छता न ठेवता गावकऱ्यांनी वर्षभर स्वच्छता राखावी. ही स्वच्छता आपल्यासाठीच आहे. आजारी पणाचे प्रमाण कमी होते. गोंदिया जिल्ह्याने शौचालय बांधकामाचे लक्ष्य पूर्ण केले असून फक्त घोषणा व्हायची आहे. पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे, असे मत मांडले.
यावेळी तपासणी चमूने संपूर्ण गाव फिरुन स्वच्छतेची पाहणी केली. संचालन ग्रामसेवक एस.एस. रहांगडाले यांनी केले. आभार शिक्षक मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाच्या महिला तसेच गावकऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)