ग्रामविकास अधिकाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST2021-03-31T04:29:35+5:302021-03-31T04:29:35+5:30
गोंदिया : सरपंच पतीच्या त्रासाला कंटाळून ग्रामविकास अधिकाऱ्यांनी विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (दि.३०) सकाळी मृत्यू झाला. ...

ग्रामविकास अधिकाऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
गोंदिया : सरपंच पतीच्या त्रासाला कंटाळून ग्रामविकास अधिकाऱ्यांनी विष प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी (दि.३०) सकाळी मृत्यू झाला. सरपंच पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी विष प्राशन करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या पत्राच्या आधारे उघडकीस आले. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी मृतदेह पोलीस ठाण्यात मांडून सरपंच पतीच्या अटकेची मागणी केली. मात्र पोलिसांनी आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कलम वाढवून दिल्यानंतर सायंकाळी ६ वाजता कुटुंबीयांनी मृतदेह उचलला. शिवकुमार चैतराम रहांगडाले (रा. आदर्श कॉलनी, गोरेगाव) असे आत्महत्या करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, शिवकुमार रहांगडाले शिवकुमार रहांगडाले हे मागील ४ वर्षांपासून ग्राम कुऱ्हाडी येथे ग्रामविकास अधिकारी पदावर कार्यरत आहेत. बुधवारी (दि. २४) त्यांनी दोनदा उलटी केल्याने त्यांना गोंदिया गायत्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. यावर डॉक्टरांनी त्यांच्या पत्नी अंतकला शिवकुमार रहांगडाले (५०,रा.आदर्श कॉलनी,गोरेगाव) यांना शिवकुमार यांनी विष प्राशन केल्याचे सांगितले. तर शिवकुमार यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी शुक्रवारी (दि.२६) अंतकला यांना उपचाराच्या दृष्टीने शिवकुमार यांनी कोणते विष प्राशन केले ते बघण्यास सांगितले. यावर त्यांनी घरी जाऊन शिवकुमार यांची बॅग बघितली असता त्यात त्यांना शिवकुमार यांनी लिहिलेले पत्र मिळून आले. त्यात शिवकुमार यांनी मागील १ वर्षापासून सरपंचांचे पती मार्तंड पारधी ग्रामपंचायतच्या कामात हस्तक्षेप करीत असल्याचे लिहिले आहे. चुकीचे बिल देऊन पैसे काढण्यासाठी प्रवृत्त करीत असून तसे न केल्यास वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी करून खोटी कामे करण्यासाठी दबाव आणतात. त्यांच्या त्रासाला कंटाळून मानसिक संतुलन बिघडल्याने आत्महत्या करीत असल्याचे पत्रात नमूद आहे.
या पत्राच्या आधारे अंतकला रहागंडाले यांनी ग्रामसेवक संघटनेच्या पाधिकाऱ्यांसोबत जाऊन शनिवारी (दि. २७) गोरेगाव पोलिसांत तक्रार देत शिवकुमार यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पारधी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावेळी गोरेगाव ठाणेदार सचिन मैत्रे यांनी मृत्यू न झाल्याने ३०६ चा गुन्हा दाखल होणार नसल्याचे सांगत आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार दाखल करुन घेतली होती. त्यानुसार सोमवारी (दि.२९) पारधीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन दिला. मात्र मंगळवारी (दि.३०) शिवकुमार यांचा मृत्यू झाला. यामुळे संतापलेल्या त्यांच्या कुटुंबीयांनी शिवकुमार यांचा मृतदेह दुपारी २ वाजता थेट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारात ठेवला व पारधीला अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, ठाणेदार मैत्रे यांनी या प्रकरणात पारधीवर कमल ३०६ वाढविल्यानंतर सायंकाळी ६ वाजता कुटुंबीयांनी शिवकुमार यांचा मृतदेह उचलला. आता कलम वाढल्याने पारधीला अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक मैत्रे यांनी सांगीतले.
-------------------------
४ तास मृतदेह पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच
पारधीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कलम लावत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा पवित्राच शिवकुमार यांचे कुटुंबीय व ग्रामसेवक संघटनेने घेतला होता. यासाठी त्यांनी दुपारी २ वाजता मृतदेह पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारात मांडला होता. अखेर पोलीस निरीक्षक मैत्रे यांच्या आश्वासनांतर सायंकाळी ६ वाजता शिवकुमार यांचा मृतदेह उचलण्यात आला.
----------------------------