स्वतंत्र विदर्भासाठी आता ‘विदर्भ माझा’ मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2016 01:48 IST2016-01-24T01:48:46+5:302016-01-24T01:48:46+5:30
सन १९८० पासून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे. संयुक्त महाराष्ट्र या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री स्व. नाशिकराव तिरपुडे यांनी विदर्भ विकास महासभेची स्थापना केली होती.

स्वतंत्र विदर्भासाठी आता ‘विदर्भ माझा’ मैदानात
तिरपुडे यांची माहिती : सहभागी होण्याचे आवाहन
गोंदिया : सन १९८० पासून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे. संयुक्त महाराष्ट्र या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री स्व. नाशिकराव तिरपुडे यांनी विदर्भ विकास महासभेची स्थापना केली होती. या महासभेत विदर्भाचा अनुशेष ४० हजार कोटी असल्याची माहिती दिली होती. मात्र सातत्याने विदर्भाच्या मागणीला दडपण्याचे काम मराठवाड्यातील नेत्यांकडून होत आहे. आता ही मागणी ‘विदर्भ माझा’ हा पक्ष रेटून धरणार, अशी माहिती नाशिकराव तिरपुडे यांचे पुत्र राजकुमार तिरपुडे यांनी दिली.
त्यांनी विदर्भ माझा हा पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाच्या माध्यमातून विदर्भाच्या मागणीला बळ देण्याचा संकल्प करून ते विदर्भाचा दौरा करित आहेत. यानिमित्त स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्र परिषदेत ते स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर बोलत होते.
ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच एका साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भाची मागणी स्वार्थी व काही श्रीमंताकडूनच होत असल्याची टिप्पणी केली.
यावरून पश्चिम महाराष्ट्राचे नेतेच स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला आडकाठी येत असल्याचे उघड झाले आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मागणीला आपण विदर्भ माझा हा पक्षाच्या माध्यमातून रेटून धरू, विदर्भातील जनतेने या पक्षाच्या पाठीशी उभे राहून विदर्भाच्या सन्मानाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असेही आवाहन तिरपुडे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)