वाहनांतून सळाखींची वाहतूक ठरू शकते जीवघेणी
By Admin | Updated: June 25, 2015 00:47 IST2015-06-25T00:47:25+5:302015-06-25T00:47:25+5:30
शहरात मालवाहू वाहनांतून सळाखीची बिनबोभाटपणे होणारी वाहतूक अपघाताना आमंत्रण देणारी आहे.

वाहनांतून सळाखींची वाहतूक ठरू शकते जीवघेणी
गोंदिया : शहरात मालवाहू वाहनांतून सळाखीची बिनबोभाटपणे होणारी वाहतूक अपघाताना आमंत्रण देणारी आहे. यापूर्वी असल्या वाहतुकीमुळे अपघात घडले आहेत. वाहतूक नियंत्रक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
सळाखी व इतर जड वस्तूंच्या वाहतुकीला दिवसा शहरातून मनाई आहे. तसा वाहतूक विभागाचा नियमदेखील आहे . मात्र जिल्ह्यात या नियमाची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र आहे. बांधकाम साहित्य व सळाखी वाहून नेणाऱ्या वाहनांना अपघात झाला तर मोठी जीवितहानी होऊ शकते, या बाबीकडे डोळेझाक केली जात आहे. विशेष म्हणजे सळाखी वाहून नेताना त्या लवकर दृष्टीस पडाव्या म्हणून त्याला कुठले तरी चिन्ह लावण्याची गरज आहे. मात्र हा नियम पायदळी तुडविला जात आहे.
शिवाय सळाखीचा बराच भाग वाहनांच्या बाहेर आलेला असतो. अशावेळी सळाखी वाहून नेणाऱ्या वाहनाच्या चालकाने अकस्मात ब्रेक लावले तर मागेहून येणारी वाहने सळाखींवर आदळून अनुचित घटना घडू शकतात. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असताना अद्यापपर्यंत एखाद्या तरी वाहनावर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता ही नेहमीच असते. (तालुका प्रतिनिधी)
बेलगाम वाहतूक
जड वाहतुकीसोबतच मालवाहू वाहनांतून सळाखीच्या वाहतुकीला प्रचंड उधाण आले आहे. त्यामुळे सळाखींच्या बेलगाम वाहतुकीला लगाम लावण्याची मागणी आहे.