चारचाकी वाहनांना पोलिसांचे अभयदान वाहतुकीची कोंडी : दुचाकी वाहनांवरच कारवाई
By Admin | Updated: April 27, 2016 02:06 IST2016-04-27T02:06:59+5:302016-04-27T02:06:59+5:30
शहरातील अरूंद रस्ते, त्यातच बेशिस्त वाहतूक यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. ही वाहतुकीची कोंडी ...

चारचाकी वाहनांना पोलिसांचे अभयदान वाहतुकीची कोंडी : दुचाकी वाहनांवरच कारवाई
गोंदिया : शहरातील अरूंद रस्ते, त्यातच बेशिस्त वाहतूक यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. ही वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने चार वर्षापूर्वी शहराच्या बाजारात चारचाकी वाहनांना प्रवेश नाकारला होता. परंतु आता शहराच्या बाजारात चारचाकी वाहने बिनधास्त वावरतात. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे विभागातर्फे दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात येते. परंतु चारचाकी वाहनांना अभयदान दिले जात आहे.
शहराचे रस्ते अरूंद असल्यामुळे चारचाकी वाहन नेता येत नाही. चारचाकी वाहन नेले व त्या ठिकाणी दोन्ही बाजूने चारचाकी वाहने एका ठिकाणी आल्यास किंवा एखादा रिक्षा जरी आल्यास वाहतुकीची कोंडी होते. परिणामी ही वाहतुकीची कोंडी सुटतपर्यंत नागरिकांना ताटकळत उभे रहावे लागते. हा प्रकार टाळण्यासाठी वाहनचालकांकडून हॉर्न वाजवून कर्कश आवाज केला जातो. शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने बाहेरची वाहनेदेखील या रस्त्यावर धावतात. शहरातील व्यापाऱ्यांची घरे असल्याने त्यांंना त्यांचे वाहन त्यांच्या घरात नेण्यास मनाई करू शकत नाही. परंतु याचाच फायदा घेत एका वाहनाला पाहून दुसरेही आपल्या वाहनांना घेऊन जातात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. ती कोंडी टाळण्यासाठी पोलीस विभागाकडून प्रयत्न केले जातात. परंतु वाहतुकीच्या कोंडीसाठी कारणीभूत असणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई होत नाही.
शहर पोलीस ठाण्यामागील भागात असलेल्या पोलीस वसाहतीच्या ठिकाणी पार्किंग प्लाझा तयार करण्याचे ठरविण्यात आले. ही जागा नगरपरिषदेला देण्यात आली. परंतु या ठिकाणी पार्किंग प्लाझाचे काम अजूनपर्यंत सुरू झाले नाही. या पार्किंग प्लाझाकरिता मागेच जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली होती, असे सांगितले जाते. (प्रतिनिधी)