विरोधकांनी सभेत काढले वाभाडे

By Admin | Updated: November 4, 2015 02:15 IST2015-11-04T02:15:02+5:302015-11-04T02:15:02+5:30

सोमवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी

Vavhade opted out in the meeting | विरोधकांनी सभेत काढले वाभाडे

विरोधकांनी सभेत काढले वाभाडे

गोंदिया : सोमवारी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विषयसूचीवरील विषय बाजूला ठेवून धान खरेदी केंद्र सुरू न होणे व पत्रकारांना सर्वसाधारण सभेचे वृत्त संकलन करण्याकरिता मज्जाव करणे यासह जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा घडवून आणण्यास सत्ताधाऱ्यांना बाध्य केले. यामुळे ही सभा तब्बल ७ तास गाजली.
सोमवारी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरूवात होताच सभेच्या अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी सभेचे कामकाज सुरू करताच जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर व कुंदन कटारे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, धान खरेदी केंद्र सुरु न होणे व सर्वसाधारण सभेचे वृत्त संकलन करण्याकरिता पत्रकारांना मज्जाव करणे या विषयावर चर्चा करावी, अशी आग्रही मागणी केली. अध्यक्षांनी ती मागणी मान्य करुन या तीनही विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पुढील सभेपर्यंत यावर निर्णय घेण्याचे ठरले.
जिल्ह्यात पाऊस उशिरा आल्याने व धान पिकांवर मोठ्या प्रमाणावर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली व जे काही धान निघाले त्याची विक्री करण्याकरिता शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. धान खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत व दुष्काळसदृश परिस्थिती असल्याबाबत शासनाला ठराव करुन पाठविण्यात यावे असे सर्वानुमते ठरले. त्यानंतर विषय सूचीवरील विषयांवर चर्चा होऊन त्यामध्ये आरोग्य विभाग कसा सुस्त झोपला आहे याचे वास्तव दोन्ही बाजूच्या सदस्यांनी सभागृहासमोर ठेवले. जिल्ह्यात डॉक्टर नाहीत.
पुर्वी उपसंचालकांना डॉक्टराची भर्ती करण्याचे अधिकार होते. त्यामुळे डॉक्टरांचा तुटवडा पडत नव्हता. हे अधिकार शासनाने आपल्याकडे घेतल्याने डॉक्टरांच्या भर्ती होत नाही. त्यामुळे अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरच नाही ही बाब तातडीने शासनाच्या निदर्शनास आणून दयावी असे ठरले.
जि.प. लघु पाटबंधारे विभागाच्यावतीने मामा तलाव कुडवा यांच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला सर्वसाधारण सभेची मंजूरी मिळण्यापुर्वीच कंत्राटदाराकडून अनामत रक्कम कशी काय घेण्यात आली? असा प्रश्न परशुरामकर, कटारे, रमेश चुऱ्हे, राजलक्ष्मी तुरकर, मनोज डोंगरे आणि इतर सदस्यांनी उपस्थित केला.
त्यावर अधिकाऱ्यांची हे चुकीचे आहे. तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी हे सर्व केले असे सांगूनही सत्ताधाऱ्यांनी त्याला मंजुरी दिली. यामध्ये मतदान होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० सदस्यांनी आपला विरोध नोंदविला.
याशिवाय महाबिजकडून आमगाव तालुक्यात शेतकऱ्यांना जे बियाणे देण्यात आले. ते बियाणे बोगस निघाल्याने तेथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तसेच सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत देण्यात येणारे अनुदान मागील अनेक वर्षापासून देण्यात आले नाही. हे विषय जि.प. सदस्य सुखराम फुंडे यांनी चर्चेला आणताच या चर्चेत खुशबू टेंभरे, रजनी गौतम, प्रिती रामटेके, ललीता चौरागडे, कैलाश पटले, सुरेश हर्षे, मनोज डोंगरे, राजेश भक्तवर्ती व इतर सदस्यांनी महाबिजच्या बियाण्यांमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई व सावित्रीबाई फुले योजनेच्या केसेस ज्या अधिकाऱ्यांनी अडवून ठेवल्या त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
सभाध्यक्षांनी ती मागणी मान्य केली. याशिवाय मागील दोन वर्षांपासून ग्राम पंचायत घरावर वसुली ही बंद असल्याने ग्राम पंचायत कर्मचारी यांचे पगार तसेच सदस्य व सरपंचांचे मानधन तसेच गावातील दिवाबत्तीची सोय करणे अडचणीचे झाले आहे. ही कर वसुली करण्याचे तातडीने शासनाने आदेश द्यावेत असा प्रश्न जि.प. सदस्य परशुरामकर यांनी उपस्थित केला. त्यावर अध्यक्षांनी ठराव करून शासनाला पाठविण्यात यावा असे निर्देश दिले. याशिवाय अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Vavhade opted out in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.