महिनाभरात ४.९२ कोटींची विविध कामे

By Admin | Updated: May 13, 2015 01:34 IST2015-05-13T01:34:22+5:302015-05-13T01:34:22+5:30

शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मात्र या योजनांचा त्यांना कितपत फायदा होतो,....

Various works of 4.92 crore in a month | महिनाभरात ४.९२ कोटींची विविध कामे

महिनाभरात ४.९२ कोटींची विविध कामे

देवानंद शहारे गोंदिया
शासन शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवित आहे. मात्र या योजनांचा त्यांना कितपत फायदा होतो, हे त्यांनाच ठावूक. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोट्यवधी रूपयांची कामे केली जातात. तरी शेतकरी आर्थिक नुकसानीत भरडला जात आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गतीमान विकास पाणलोट कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरात चार कोटी ९२ लाख १९ हजार रूपयांची कामे मार्च २०१५ या एकाच महिन्यात करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमातून वर्षभर शेततळे, नाला खोलीकरण, मजगी बांधकाम, बोडी खोलीकरण, मातीनाला बांधकाम, सिमेंट नाला बांधकाम, भात खाचर दुरूस्ती आदी अनेक कामे जिल्हाभरात करण्यात आलीत. मात्र आर्थिक वर्ष २०१५ च्या शेवटच्या मार्च या एकाच महिन्यात जवळपास चार कोटी ९२ लाख १९ हजार रूपयांची कामे करण्यात आल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले आहे. या कामांमुळे पाण्याची साठवणूक होण्यास मदत होणार असून त्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना सिंचनासाठी करता येणार आहे.
जिल्हा कृषी विभागामार्फत गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून मार्च महिन्यात एकूण २४ शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. यात गोंदिया तालुक्यात एक, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात चार, सालेकसा तालुक्यात ११, तिरोडा तालुक्यात सहा तर आमगाव तालुक्यात दोन शेततळ्यांचा समावेश आहे. याच महिन्यांत नाला खोलीकरणाची एकूण १५ कामे करण्यात आलीत. यात अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील १० तर देवरी तालुक्यात पाच नाला खोलीकरण कामांचा समावेश आहे. मजगी बांधकाम केवळ सालेकसा तालुक्यात करण्यात आले असून ते काम एकूण १४.४९ हेक्टरमध्ये करण्यात आले आहे.
याशिवाय बोडी खोलीकरणाची कामे करण्यात आली आहेत. यात गोंदिया तालुक्यात पाच, देवरी तालुक्यात तीन तर तिरोडा तालुक्यात एका बोडीच्या खोलीकरणाचा समावेश आहे. जिल्ह्यात आठ मातीनाल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. यात देवरी तालुक्यात सहा तर सालेकसा तालुक्यात दोन मातीनाला बांधकामांचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सिमेंट नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असून त्यांची संख्या ४२ आहे. यात गोंदिया तालुक्यात चार, तिरोडा तालुक्यात एक, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २०, देवरी तालुक्यात ११, आमगाव तालुक्यात तीन, सालेकसा तालुक्यात तीन सिमेंट नाल्यांचा समावेश आहे. केवळ गोंदिया तालुक्यातील ४४.३४ हेक्टर जमिनीवर भात खाचर दुरूस्तीचे काम करण्यात आले आहे. अशाप्रकारे मार्च २०१५ या एकाच महिन्यात तब्बल चार कोटी ९२ लाख १९ हजार रूपयांची कामे गतीमान पाणलोट विकास कार्यक्रमातून करण्यात आली आहेत.

किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शासन कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध उपक्रमांतर्गत कोट्यवधी रूपये खर्च करतो. तरीसुद्धा शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमकुवतच आहे. त्यामुळे या उपक्रमाचा लाभ नेमक्या किती शेतकऱ्यांना होतो, हा संशोधनाचा विषय आहे. कधी नैसर्गिक संकट तर कधी सुलतानी समस्या यात शेतकरी भरडला जात आहे. यंदा शासनाने धानावर बोनस न दिल्याने शेतकऱ्यांवर मोठाच अन्याय झाला आहे. एवढा पैसा खर्च होत असताना व शासन विविध योजना राबवित असताना अवघ्या देशाचे पोट भरणारा शेतकरी उपेक्षितच का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Various works of 4.92 crore in a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.