बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज विविध कार्यक्रम

By Admin | Updated: May 21, 2016 01:46 IST2016-05-21T01:46:24+5:302016-05-21T01:46:24+5:30

तथागत भगवान बुद्धांचा जन्म, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही महत्त्वपूर्ण घटना एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला घडल्या.

Various programs on Buddha Purnima today | बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज विविध कार्यक्रम

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज विविध कार्यक्रम

गोंदिया : तथागत भगवान बुद्धांचा जन्म, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही महत्त्वपूर्ण घटना एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला घडल्या. त्यामुळे या त्रिवार पवित्र दिवसानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्यशोधक विचार मंच
तिरोडा : सत्यशोधक विचार मंच जुनी वस्तीच्या वतीने जगजीवन वार्डात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शनिवार (दि.२१) सकाळी ७ वाजता बुद्ध वंदना घेण्यात येईल. त्यानंतर शांती मार्च काढण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता प्रा. भास्कर गायकवाड यांचे संगीतमय प्रबोधन ‘भीयायन’ होईल. रविवार (दि.२२) सकाळी ९.३० ते १०.३० वाजता ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथावर स्पर्धा परीक्षा, सायंकाळी ६.३० वाजता भंते यश (नागपूर) व प्रा. सविता बेदरकर (गोंदिया) यांचे मार्गदर्शनपर भाषणे होती. सदर कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सत्यशोधक विचार मंचातर्फे करण्यात आले आहे.
महाप्रज्ञा बुद्ध विहार
तिरोडा : येथील महाप्रज्ञा बुद्ध विहारात सकाळी ८ वाजता बुद्ध वंदना व ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध उपासक व उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विहार समितीचे अध्यक्ष अतुल गजभिये यांनी केले आहे.
तक्षशिला बुद्ध विहार
तिरोडा : तथागत भगवान बुद्धांची जयंती, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त सकाळी तक्षशिला बुद्ध विहारात बुद्ध वंदनेचे आयोजन करण्यात आले आहे. यात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विहार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
नालंदा बुद्ध विहार,चिरेखनी
तिरोडा : चिरेखनी येथील नालंदा बुद्ध विहारात बुद्ध जयंती कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. बुद्ध वंदना व मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. कार्यक्रमास ग्रामस्थ महिला-पुरूषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नवयुवक बौद्ध समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बौद्ध महासभा शाखा, भजेपार
तिरोडा : भजेपार येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा भजेपारच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते, जि.प. सदस्य रजनी कुंभरे यांच्या अध्यक्षतेखाली होईल.
सकाळी ८ वाजता परित्राण पाठ, पंचशील ध्वज वंदना व सामूहिक बुद्ध वंदना; सायंकाळी ६ वाजता सामूहिक बुद्ध वंदना व अतिथींचे मार्गदर्शन, सायंकाळी ७ वाजता स्मृतिशेष सत्यभामा बळीराम वासनिक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भोजनदान करण्यात येईल.
कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जैराम वासनिक, पवन वासनिक व आयोजकांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Various programs on Buddha Purnima today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.