9 मार्चपासून होणार प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:30 IST2021-03-06T05:00:00+5:302021-03-05T23:30:22+5:30
तालुक्यातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना तालुका अथवा जिल्हास्तरावर पायपीट करावी नाही. जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणासाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी हे तीन दिवस निश्चित केले आहे. केंद्र शासनाने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोरोना लसीकरणास सद्यस्थितीत सुरुवात केली आहे.

9 मार्चपासून होणार प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : केंद्र सरकारने १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या नागरिकांना कोरोना लसीकरणास सुरुवात केली. सुरुवातीला सरकारी आणि जिल्ह्यातील मोजक्याच सहा खासगी रुग्णालयांना लसीकरणाची मंजुरी दिली होती. त्यामुळे या केंद्रावर गर्दी वाढल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. हा त्रास दूर करण्यासाठी आता जिल्ह्यातील एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ९ मार्चपासून कोराेना लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.
तालुक्यातीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण करण्यात येणार असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना तालुका अथवा जिल्हास्तरावर पायपीट करावी नाही. जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणासाठी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी हे तीन दिवस निश्चित केले आहे. केंद्र शासनाने कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील दुर्धर आजाराच्या रुग्णांना कोरोना लसीकरणास सद्यस्थितीत सुरुवात केली आहे. जिल्ह्यात ६० वर्षावरील नागरिकांची संख्या १ लाख ३० हजार आहे तर ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या ५ लाखांवर आहे. लसीकरणाची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मायक्रो प्लॅन तयार करण्याच्या सूचना केल्या आहे. हा प्लॅन तयार झाल्यानंतर लसीकरणाचा वेग कसा वाढविता येईल या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे. तशा सूचना सुध्दा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ९ मार्चपासून प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस घेता येणार आहे.
शीत साखळी केंद्रासह इतर सुविधांची चाचपणी
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ९ मार्चपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. लस साठवून ठेवण्यासाठी शीत साखळी केंद्र, दररोज किती जणांना लस द्यायची याचे नियोजन, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती तसेच आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याचे निर्देश सुध्दा प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आले आहे.