लसच उपाय, जिल्ह्यात लसीकरणानंतर एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:31 IST2021-04-23T04:31:49+5:302021-04-23T04:31:49+5:30
गोंदिया : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शासनानेदेखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची ...

लसच उपाय, जिल्ह्यात लसीकरणानंतर एकही मृत्यू नाही
गोंदिया : कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी लसीकरण हाच त्यावरील सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे शासनानेदेखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ५० हजार असून लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील एकूण १ लाख २५ हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. तर, १५२३४ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ४० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण केल्यानंतर एकही जण दगावल्याची नोंद जिल्ह्यात झालेली नाही. मात्र, लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर ३४५ जण कोरोनाबाधित झाले आहे. यापैकी बरेच जण बरेदेखील झाले आहे. लसीकरणाच्या तुलनेत लसीचे दाेन्ही डोस घेतल्यानंतर पाॅझिटिव्ह येणाऱ्यांची संख्या ५ ते ६ टक्के आहे. पण, लसीकरणानंतर कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केल्याने अनेकांना कोरोनाला दूर ठेवण्यापासून मदत झाली आहे. त्यामुळे कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरसुद्धा सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.
.........
पहिल्या डोसनंतर केवळ पाच टक्के पाॅझिटिव्ह
- जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार जणांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला. तर, १५ हजार नागरिकांना कोरोनाचा दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २४५ जण पॉझिटिव्ह आले, तर दोन्ही डोस घेतल्यानंतर १०० जण पॉझिटिव्ह आल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे.
- कोरोनाचा संसर्ग वाढत असून यापासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरणानंतर कोरोनाबाधित येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तर, लस घेतलेल्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही.
- कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरसुद्धा मास्क, सॅनिटायझर यांचा नियमित वापर आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे गरजेचे आहे.
- लसीकरणासंदर्भात कुठलाही संभ्रम न बाळगता पुढे येत लसीकरण करून घ्यावे.
.....................
लस महत्त्वाची, मृत्यूचा धोका होतो कमी
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४० हजार नागरिकांना काेरोना लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरण केल्यानंतर एकाही नागरिकाचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे नाही. त्यामुळे लसीकरणानंतर निश्चितच मृत्यूचा धोका कमी होताे. त्यामुळे सर्वांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा.
..........
दोन्ही डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण नगण्य
जिल्ह्यात १ लाख २५ हजार नागरिकांनी कोरोनाचा पहिला, तर १५ हजार नागरिकांनी कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस घेतल्यानंतर केवळ १०० जण पॉझिटिव्ह आल्याची नोंद आहे. मात्र, हे प्रमाण नगण्य असून लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित आहे.
.......
कोट :
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरणानंतर कुणी दगावल्याची नोंद जिल्ह्यात झालेली नाही. लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे.
- डॉ. संजय पांचाळ, लसीकरण मोहीम अधिकारी
....
एकूण रुग्ण :
एकूण कोरोनामुक्त :
एकूण कोरोनाबळी
...........
आतापर्यंत किती जणांना लस दिली : १ लाख ४० हजार
केवळ पहिला डोस किती जणांनी घेतला : १ लाख २५ हजार
दोन्ही डोस किती जणांनी घेतले : १५६४६