जिल्ह्यातील ४४ हजार नागरिकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:53+5:302021-03-19T04:27:53+5:30
गोंदिया : राज्यासह जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा उद्रेक बघता आरोग्य विभागाकडून जेथे लसीकरणासाठी केंद्र वाढविले जात आहेत. तेथेच आता ...

जिल्ह्यातील ४४ हजार नागरिकांचे लसीकरण
गोंदिया : राज्यासह जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा उद्रेक बघता आरोग्य विभागाकडून जेथे लसीकरणासाठी केंद्र वाढविले जात आहेत. तेथेच आता नागरिकांचा कल लसीकरणाकडे वाढत असताना दिसत आहे. जिल्ह्यातील आकडेवारी बघितल्यास जिल्ह्यात बुधवारपर्यंत ४३,६९५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये ३७,९८७ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला असून ५७०८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
मागील वर्षभरापासून कोरोनाने अवघ्या जगातच कहर केला आहे. मागील वर्षी कोरोनाची सुरुवात झाली व त्यानंतर मध्यंतरीचा काही काळ सुखाचा गेला. मात्र, आता पुन्हा फोफावत असून अवघ्या देशात पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली आहे. यात राज्यात सर्वाधिक उद्रेक असून जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारीही दिवसेंदिवस असताना दिसत आहे. कोरोनाचा हा उद्रेक बघता आरोग्य विभागाने जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करून सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आता लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून दिली आहे, जेणेकरून नागरिकांना त्यांच्याजवळील रूग्णालय तसेच आरोग्य केंद्रात लसीकरण करता यावे. आरोग्य विभागाच्या या प्रयत्नांना यश येत असून कोरोनाचा वाढता उद्रेक बघता नागरिक आपसूकच लसीकरणासाठी पुढे येत असताना दिसत आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंतची (दि.१७) लसीकरणाची आकडेवारी बघितल्यास ४३,६९५ नागरिकांनी कोरोनाची लस घेतल्याचे दिसत आहे. यामध्ये ३७,९८७ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, तर ५७०८ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
------------------------------
लसीकरणासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गरज
जिल्ह्यात लसीकरणाला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत असले, तरीही आहे ती स्थिती तेवढी चांगली म्हणता येणार नाही. कोरोनाचा उद्रेक वाढू लागला आहे. अशात नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करवून घेण्याची गरज आहे. मात्र, आजही नागरिकांचा तेवढा प्रतिसाद नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. नागरिकांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लवकरात लवकर आपला पहिला व दुसरा डोस घेण्यासाठी स्वत: पुढे यावे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी कळविले आहे.
-------------------------------------
१३,६०० ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण
कोरोनापासून ज्येष्ठ नागरिकांना तसेच काही आजार असलेल्या नागरिकांना धोका असल्याने शासनाने ६० वर्षांवरील नागरिक तसेच ४५ वर्षांपेक्षा जास्त व्यक्त ज्यांना काही आजार आहेत, अशांसाठी लसीकरणाला परवानगी दिली आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांत लस उपलब्ध करवून दिली आहे. त्यानुसार शहरातील ५ खाजगी रुग्णालयांत लसीकरण सुरू असून जिल्ह्यातील १३,६०० ज्येष्ठ नागरिकांनी खाजगी व शासकीय रुग्णालयात जाऊन पहिला डोस घेतल्याचे दिसून येत आहे. शिवाय ४५ ते ६० वयोगटातील ६१४८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.