योजनांची माहिती मिळण्यासाठी संवाद पर्व उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:26 IST2017-08-30T21:25:45+5:302017-08-30T21:26:24+5:30

जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने शासन विविध योजना राबविते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेला संवाद पर्व कार्यक्रम विविध योजनांची माहिती मिळण्यास उपयुक्त आहे,

Useful for communication purposes | योजनांची माहिती मिळण्यासाठी संवाद पर्व उपयुक्त

योजनांची माहिती मिळण्यासाठी संवाद पर्व उपयुक्त

ठळक मुद्देसुनील सोसे : अर्धनारेश्वरालय येथे संवाद पर्व, विद्यार्थ्यांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने शासन विविध योजना राबविते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेला संवाद पर्व कार्यक्रम विविध योजनांची माहिती मिळण्यास उपयुक्त आहे, असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले.
मंगळवार (दि.२९) रोजी सालेकसा तालुक्यातील हलबीटोला येथील अर्धनारेश्वरालय देवस्थान जिल्हा माहिती कार्यालय व अर्धनारेश्वरालय गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद पर्व कार्यक्रम घेण्यात आला. यात अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी घनश्याम तोडसाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. येरणे, नायब तहसीलदार ए.बी. भुरे, सहायक पशुधन विकास अधिकारी डॉ.पी.ए. शेगोकार, रोहयोचे सहायक कार्यक्रम अधिकारी डी.जी. रहांगडाले, स्वच्छ भारत मिशनचे गट समन्वयक जी.डी. पटले व अर्धनारेश्वरालय देवस्थानचे अध्यक्ष गोविंदराम वरकडे उपस्थित होते.
सोसे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची माहिती संवाद पर्वच्या माध्यमातून मिळण्यास मदत होत आहे. उपस्थित ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे. त्यामुळे या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ घेणे सोईचे होईल. महिला आर्थिक विकास महामंडळ महिलांना सक्षम करण्याचे काम करीत आहे. सालेकसा तालुक्यातील १ हजार २६० पैकी ९८३ महिला बचतगटांना विविध व्यवसाय उद्योगासाठी फिरता निधी दिला आहे.
तालुक्यातील प्रत्येक गावच्या ग्रामसंस्थेला देखील तीन लाखांचा निधी दिला असल्याचे सांगून सोसे म्हणाले, त्यामुळे गावातील बचतगटांना सक्षम करण्याचे काम ग्रामसंस्था करीत आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम माविम राबवित आहे. कृषी सखीच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी व पशू सखीच्या माध्यमातून शेळी पालनाच्या व्यवसायातून स्वावलंबी होण्यासाठी महिलांना मदत होत आहे, असे त्यांनी सांगितले.
या वेळी भुरे म्हणाले, विविध सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना राबविण्यात येतात. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृध्दापकाळ योजना राबविण्यात येतात. कुटुंबातील महिलांचे नाव सातबारावर नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांचे मतदार यादीत नाव नाही त्यांनी मतदार यादीत आपल्या नावांची नोंदणी करावी, असे देखील आवाहन त्यांनी केले.
देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गोविंदराम वरकडे यांनी देखील उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने संवाद पर्वच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी संवाद पर्व आयोजनामागची भूमिका विषद केली. महाकर्जमाफी, प्रधानमंत्री मुद्रा योजना यासह अन्य योजनांची माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. उपस्थित नागरिक व विद्यार्थ्यांना या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
संचालन बाजीराव तरोणे यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले. कार्यक्रमासाठी श्रीणू वई, लोकेश कोरे, भरत शाहू, पवन पटले, नवीन भेंडारकर, चेतन बिसेन, सुभाष भेंडारकर, स्वप्नील सांगोळे, अनुसया कोरे, हंसकला शेंडे, धर्मशीला उईके, ममता कापसे, रत्नमाला किरसान, वैशाली नाईक, भुमेश्वर कापसे, लक्ष्मी भेंडारकर, ग्यानीराम वाढई यांनी सहकार्य केले. कार्यक्र माला हलबीटोला ग्रामस्थ व गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेला तालुक्यातून मोठ्या संख्येने आलेले विद्यार्थी उपस्थित होते.
कृषीविषयक योजनांचा लाभ घ्या
भात पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी पीक विस्तार कार्यक्रम आहे. शेतकरी फळ लागवडीकडे वळला पाहिजे, यासाठी देखील १०० टक्के अनुदानावर योजना आहेत. सेंद्रीय तांदळाला प्रोत्साहन देण्याचा कार्यक्र म जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळण्यास मदत होईल. कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान, सुक्ष्म सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला बोडी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व कृषी अभियांत्रिकी योजना यासह अनेक योजना राबविण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी घनश्याम तोडसाम यांनी सांगितले.
आरोग्यविषयक विविध योजना
वाढती लोकसंख्या कुटूंब कल्याण कार्यक्र मामुळे नियंत्रणात येत आहे. जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना व नवसंजीवनी योजना या गरोदर माता व बालकांसाठी आहेत. मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत देखील आरोग्य योजना राबविण्यात येतात. साथीवर नियंत्रण आणण्यासाठी साथरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतात. कुष्ठरोग व क्षयरोगाचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी देखील योजना असल्याचे या वेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. येरणे यांनी सांगितले.
 

Web Title: Useful for communication purposes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.