सुदृढ आरोग्यासाठी शौचालयाचा वापर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 01:54 IST2016-07-29T01:54:55+5:302016-07-29T01:54:55+5:30
शरीर हीच मानव जातीची मोठी संपत्ती आहे. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी समाजातील प्रत्येकानेच नित्यनेमाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा.

सुदृढ आरोग्यासाठी शौचालयाचा वापर करा
उषा मेंढे : स्वच्छ भारत मिशन आढावा सभेत मार्गदर्शन
इसापूर : शरीर हीच मानव जातीची मोठी संपत्ती आहे. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी समाजातील प्रत्येकानेच नित्यनेमाने शौचालय बांधून त्याचा वापर करावा. त्यामुळे समाजात आरोग्यावर होणारा खर्च कमी होऊन आपली आर्थिक बचत होईल व पर्यायाने आपला विकास होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे यांनी केले.
त्या अर्जुनी मोरगाव पंचायत समितीत आयोजित स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) आढावा सभेच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, शासनाच्या विविध योजना असून शौचालय बांधकामासाठी शासनाकडून बारा हजार रुपये अनुदान मिळत असून अनेक लोक शौचालय बांधतात, पण वापर करीत नाही. कुटुंबातील सर्व लोक उघड्यावर शौचास जातात. आपली आई-बहीण आदी महिला वर्गसुद्धा उघड्यावर शौचास जातात. कधी कधी तर साप, विंचवामुळे दुर्घटना घडतात. हे सर्व टाळण्यासाठी १८ व १९ जुलैला दिल्ली येथील कार्यशाळेत मी स्वत: जि.प. अध्यक्ष म्हणून ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचे वचन दिले आहे. हे वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता विभाग) राजेश देशमुख, लेखा विभागाचे सहायक लेखा विभाग अधिकारी जंवजाळ, अर्जुनी-मोरगाव पं.स. सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती आशा झिलपे, खंड विकास अधिकारी नारायणप्रसाद जमईवार, पं.स. सदस्य रामलाल मुंगगकर उपस्थित होते.
प्रास्ताविकात खंड विकास अधिकारी नारायण जमईवार यांनी अर्जुनी मोरगाव पंचायत समिती शासनाच्या विविध योजना राबवून ग्रामविकास करण्यासाठी सदैव तत्पर राहते. आतापर्यंत तालुक्यातील १३ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या असून या आर्थिक वर्षात ७० पैकी १२ ग्रामपंचायतींनी ४० लाख रुपयांच्या वर मग्रारोहयोचे कामे करुन १ एप्रिल ते १५ जुलै २०१६ पर्यंत साडेतीन महिन्यांच्या काळात १६ कोटी रुपयांचे काम करुन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन दिले.
या वेळी हागणदारी मुक्त ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी सरपंचाची असून तुम्ही तुमच्या गावचे मुख्यमंत्री आहात. योजना जनतेपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणारा सरपंच हा दूत आहे, असे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत फुलकुंडवार यांनी आपला जिल्हा ३१ डिसेंबरपर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करु. गावातील एकही व्यक्ती बाहेर शौचास जाणार नाही, असा संकल्प करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेला सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्रामरोजगार सेवक, सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते. संचालन कृषी विकास अधिकारी डी.बी. उईके व गटसमन्वयक एच.आर. अंबुले यांनी केले. आभार सहायक खंड विकास अधिकारी राजेश वलथरे यांनी मानले. (वार्ताहर)