चिचगड येथे सुरू होणार अपर तहसील कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2017 01:14 IST2017-04-12T01:14:58+5:302017-04-12T01:14:58+5:30
देवरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी चिचगड येथे लवकरच अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार आहे.

चिचगड येथे सुरू होणार अपर तहसील कार्यालय
१२ पदे मंजूर : पुराम यांचे यशस्वी प्रयत्न
देवरी : देवरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी क्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी चिचगड येथे लवकरच अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार आहे. त्याकरीता १२ पदे मंजूर करवून घेण्यात आ. संजय पुराम यांना यश आले आहे.
यासंबंधी मागील १ वर्षापासून पाठपुरावा करीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आदिवासी जनतेच्या मागणीचे निवेदन सादर केले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी १२ पदे मंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले. संबंधीत अधिकाऱ्यांना यासंबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असल्याने चिचगड येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू होवून काही दिवसांनी कायमस्वरुपी तहसीलयाचा दर्जा देण्यात येईल असे कळविले.
चिचगड क्षेत्रातील ककोडी, पालांदूर, घोनाडी, येडमागोंदी येथील सर्व आदिवासी जनतेला ४० ते ५० किमी अंतर कापून शासकीय कामाकरीता देवरी येथे यावे लागते. आर्थिक त्रास तसेच नक्षलग्रस्त क्षेत्रात बसेसचा अभाव यामुळे लोकांना फारच त्रास सहन करावा लागतो. आता ही समस्या लवकरच संपुष्टात येणार आहे.
चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयात तहसीलदार १, नायब तहसीलदार १, अव्वल कारकून २, लिपीक, टंकलेखक ८ अशी एकूण १२ पदे मंजूर झाली असून लवकरच अप्पर तहसील कार्यालय सुरू होणार आहे.(प्रतिनिधी)