गणेशनगरमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य
By Admin | Updated: May 31, 2014 00:01 IST2014-05-31T00:01:25+5:302014-05-31T00:01:25+5:30
प्रभाग- ९ मध्ये अस्वछतेने कळस गाठला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र नगरसेवकांसह नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रभागात तातडीने स्वच्छता मोहीम

गणेशनगरमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य
गोंदिया : प्रभाग- ९ मध्ये अस्वछतेने कळस गाठला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र नगरसेवकांसह नगर परिषदेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रभागात तातडीने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा प्रभागवासीयांनी दिला आहे.
गणेश नगरमधील प्रभाग- ९ मध्ये शासकीय व निमशासकीय अधिकार्यांसह प्रतिष्ठित नागरिक, वकील, व्यवसायिकांसह सर्वसामान्य नागरिक राहतात. या परिसरात रुग्णालये असून महत्वाची शासकीय व निमशासकीय कार्यालयेसुद्धा आहेत. परंतु पालिका प्रशासन व नगरसेवकांच्या दुर्लक्षणामुळे घाणीचे साम्राज्य पसरत आहे.
प्रभागाच्या नाल्यांतील घाण गेल्या अनेक दिवसांपासून काढण्यात आली नसल्याने नाल्या तुंबलेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे नाल्यातील घाण रस्त्यावर पसरुन सर्वत्र दुर्गंंधी पसरलेली आहे. घंटागाडीही नियमित फिरत नसल्याने ठिकठिकाणी कचर्याचे ढिगारे साचले आहेत. प्रभागातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्याने ये-जा करावी लागते. अशा अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. पावसाळ्यात प्रभागातील अस्वच्छतेने गंभीर रुप धारण केले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याबाबत पालिका व नगरसेवकांकडे तक्रार करुनही वेळकाढूपणाचे धोरण अवलंबले जात असल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे तातडीने प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा प्रभागातील अतुल बहेकार, दिनेश चौधरी, वाय.एस. बहेकार, पी.जी. येलमे, शीला बोहरे, रविंद्र भदाडे, रमेशकुमार मुरकुटे, के.पी. चौरावार, हितेश मानकर, धनीराम दोनोडे, इंद्रराज मारवाडे, जितेश जिमजे, महेश मिश्रा, अशोक मानकर, नितीन रंगारी, लक्की मिश्रा, सोनू गुप्ता आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)