अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान
By Admin | Updated: March 20, 2015 00:56 IST2015-03-20T00:56:35+5:302015-03-20T00:56:35+5:30
जिल्ह्यात २ व ३ मार्च रोजी अवकाळी पाऊस व १६ मार्चच्या रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस व गारपिटी पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठेच नुकसान झाले.

अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान
गोंदिया : जिल्ह्यात २ व ३ मार्च रोजी अवकाळी पाऊस व १६ मार्चच्या रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस व गारपिटी पडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठेच नुकसान झाले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीला घेवून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
जिल्ह्यात २ व ३ मार्च रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडले. त्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेले जवस, लाखोळी, हरभरा, गहू, धान, केळीची बाग, आब्यांची बाग व भाजीपाला पिकांचे मोठेच नुकसान झाले. तसेच १६ मार्चच्या रात्री पुन्हा अचानक पाऊस आल्याने व ठिकठिकाणी मोठ्या आकाराची गारपिटी पडल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानच झाले. केंद्र व राज्य शासनाच्या नितीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यातच निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी खालावत चालली आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानाची आर्थिक भरपाई त्वरित देण्यात यावी, शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे २०० रूपये बोनस, वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई, ग्रामीण भागात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कार्य अविलंब सुरू करण्यात यावे, उच्च प्रतिच्या धानाची कमी केलेली किंमत वाढविण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदन देतेवेळी जिल्हा राकाँ अध्यक्ष विनोद हरिणखेडे, प्रदेश प्रतिनिधी गंगाधर परशुरामकर, तालुका अध्यक्ष कुंदन कटारे, कृउबासचे सभापती चुन्नी बेंद्रे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजू एन. जैन, बाळा हलमारे, जि.प. सदस्य छोटू पटले, जगदीश बहेकार, नरेंद्र तुरकर, जिल्हा ग्राहक संरक्षण अध्यक्ष भूवन रिनाईत, कृउबासचे संचालक तिर्थराज हरिणखेडे, अखिलेश सेठ, पं.स. सदस्य रामू चुटे, तालुका युवक अध्यक्ष मुरली लिल्हारे, पूरणलाल उके, मदन चिखलोंढे, रविंद्र हेमने, रामेश्वर ठकरेले, गंगाराम कापसे, ज्ञानेश्वर चिखलोंढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मंगळवारच्या रात्री ९.३० वाजता गोंदिया शहरात जवळपास १० मिनिटे जोरात पाऊस आला. असा पाऊस जिल्ह्याच्या इतर कोणत्याही भागात पडले नाही. त्यापूर्वी सोमवारच्या रात्री १२.२० वाजता जवळपास संपूर्ण जिल्ह्यात कुठे जोराम तर कुठे मध्यम पाऊस आला. सोबतच काही गावांत लहान तर काही गावांत मोठ्या आकाराच्या गारपिटी पडल्या. ज्या गावांत मोठ्या गारपिटी पडल्या तेथे ग्रामस्थांना मोठेच नुकसान झाले.
गोंदियापासून पाच किमी दूर रापेवाडा येथे गारपिटींच्या वर्षावामुळे ग्रामस्थांचे मोठेच नुकसान झाले. तेथील वयोवृद्ध ग्रामस्थांनी सांगितले की अर्ध्या किलोपर्यंच्या वजनाच्या गारपिटी त्यांनी गावात पडताना कधीच पाहिले नव्हते. तनस ढिगात सकाळपर्यंत गारपिटी पाहण्यात आल्याचे काही युवकांनी सांगितले.
गारपिटींमध्ये घरांवरील कवेलू मोठ्या प्रमाणात फुटले. सिमेंट सिटवरही मोठ्या आकाराचे गारपिटी पडल्यामुळे छिद्र दिसत आहेत. रापेवाडाच्या युवकांनी आंब्यांच्या झाडावरील पडलेल्या कैऱ्या दाखविल्या. तसेच मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.अधिकाऱ्यांनी गावात येवून निरीक्षण करावे व नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाकडे सिफारिश करावी, अशी मागणी रापेवाडा येथील पुनाराम मौजे, गुरूप्रसाद चव्हाण, हौसलाल रहांगडाले, संजय वैद्य, अंकेश येडे, विजय रहांगडाले, मुन्ना तुरकर, हिरालाल पंधरे, राजा नेवारे यांनी केली आहे. चुटिया क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात गारपिटी पडल्यामुळे नुकसान झाले आहे. शासनाने पीडित ग्रामस्थांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राकाँपाचे माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांनी केली आहे. गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा, शहारवानी येथेसुद्धा मोठ्या आकाराची गारपिटी पडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सोमवारच्या रात्री या गारपिटी कवेलू फोडून घरांत पडत होते, त्यावेळी प्रलय आल्यासारखे वाटत होते. रात्रभर ते आपल्याच घरात त्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात सकाळपर्यंत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील देऊळगाव, बोदरा, बोंडगावदेवी, निमगाव, पिपळगाव येथे १२४ घरे नुकसानग्रस्त झाले. महसूल विभागाने २.४० लाख रूपयांच्या नुकसानीचा अंदाज लावला आहे. ग्रीन शेड लावून शिमला मिरची, टमाटर व भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे या क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सांगितले. तर महागाव, गौरनगर व केशोरी गावांत मिरची पिकास मोठाच नुकसान झाल्याचे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)