कौशल्य विकास व रोजगार मेळाव्यात बेरोजगारांची झुंबड
By Admin | Updated: April 12, 2017 01:14 IST2017-04-12T01:14:13+5:302017-04-12T01:14:13+5:30
सडक अर्जुनी येथील पंचायत समितीसमोरील पटांगणावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने ...

कौशल्य विकास व रोजगार मेळाव्यात बेरोजगारांची झुंबड
युवक-युवतींची नोंदणी : विदर्भातील आणि बाहेरील अनेक कंपन्यांचे स्टॉल
गोंदिया : सडक अर्जुनी येथील पंचायत समितीसमोरील पटांगणावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या वतीने आयोजित कौशल्य विकास मार्गदर्शन व रोजगार मेळाव्यात सोमवारी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील अनेक बेरोजगार युवक-युवतींनी हजेरी लावली.
यावेळी लावण्यात आलेल्या विविध स्टॉलच्या माध्यमातून आवश्यक त्या प्रशिक्षणाचे अर्ज विद्यार्थ्यांनी भरु न दिले व विविध प्रशिक्षणाविषयी माहिती जाणून घेतली. त्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अर्थशास्त्र विषयावर प्रफुल्ल पवार, चंद्रपूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राठोड व करिअर प्लॅनिंगबाबत शैली गंभीर, उद्योजकता या विषयावर आनंद खडतकर यांनी मार्गदर्शन केले.
या मेळाव्यात बार्टी, टॉप्स ग्रुप्स, थिंक स्कील, इंफोनेट, जावेद हबीब, बँक आॅफ इंडिया, रु स्तमजी ग्लोबल एजंसी, आय.बी.पी.एस.वर्धा, भंडारा, यवतमाळ, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा यांच्यासह फ्युचर शार्प स्किल्स, सुखकर्ता इंजिनियरींग क्लस्टर पुणे, महाराष्ट्र स्टेट स्किल डेव्हलपमेंट सोसायटी, बी-एबल, क्विज कॉर्पोरेशन, हिंदूस्थान लॅटेक्स फॅमिली प्लॅनिंग प्रमोशन ट्रस्ट, ज्ञानदा इन्स्टीट्यूट आॅफ प्लो पायपिंग टेक्नॉलॉजी, युवा परिवर्तन गोंदिया, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, महाराष्ट्र सेंटर फॉर इंटरपीनरशिप डेव्हलपमेंट, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा माहिती कार्यालय, खादी व ग्रामोद्योग मंडळ, कृषी विभाग, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत असलेले महामंडळे, आरव्हीएस एज्युकेशन ट्रस्ट, माविमचे आधार लोकसंचालीत साधन केंद्र, रमाबाई व लक्ष्मी महिला बचतगट डोंगरगाव, ओरियन एज्युटेक, बार्टी आयबीपीएस, आरोग्य विभाग, कविरा सोल्युशन, सामाजिक न्याय विभाग, जागृती महिला बचतगट, नागझिरा स्वयंसहायता बचतगट, शेतकर्णी, जागृती, महासरस्वती महिला बचतगट आदींचे स्टॉल तथा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा चित्ररथ यामध्ये लावण्यात आला होता.
कार्यक्रमाला गोंदियाचे एसडिओ अनंत वालस्कर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक खडसे, सडक अर्जुनीचे तहसीलदार विठ्ठल परळीकर, गोरेगावचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट, प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी बार्टीचे अधिकारी व कर्मचारी, समाजकल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच समतादूत यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक बार्टीच्या निबंधक रुपाली आवळे यांनी तर संचालन रवि वरके आणि रजनी गायधने यांनी संयुक्तपणे केले. (जिल्हा प्रतिनिधी)