वीज ग्राहकांना अघोषित भारनियमनाचा शॉक
By Admin | Updated: August 13, 2015 02:15 IST2015-08-13T02:15:09+5:302015-08-13T02:15:09+5:30
गोंदिया शहरासह ग्रामीण भागात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. परंतु महावितरणकडून कोणतेही भारनियमन सुरू नाही, असे सांगितले जात आहे.

वीज ग्राहकांना अघोषित भारनियमनाचा शॉक
दररोज वीज गायब : महावितरण म्हणते, भारनियमन नाही!
गोंदिया : गोंदिया शहरासह ग्रामीण भागात दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. परंतु महावितरणकडून कोणतेही भारनियमन सुरू नाही, असे सांगितले जात आहे. त्यामुळे दररोज खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामागील नेमके कारण काय, असा प्रश्न सर्वसामान्य वीज ग्राहकांना पडला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात विजेची मागणी प्रचंड वाढलेली असतानाही दररोज वीज पुरवठा खंडित होत नव्हता. मात्र आता ब्रेक डाऊन, वाहिन्यांमधील बिघाड व ट्रान्सफार्मरमधील बिघाड असे एक ना अनेक कारण पुढे करून दररोज खंडित केल्या जात असलेल्या वीज पुरवठ्याने जिल्हावासीय त्रस्त झाले आहेत.
या खंडीत विद्युत पुरवठ्याला विद्युत वितरण कंपनी नियमित भारनियमन न समजता ‘इमरजन्सी लोडशेडिंग’ म्हणत आहे. पण दररोजच गोंदिया शरात व ग्रामीण भागात कोणते ना कोणते कारण दाखवून दररोज विद्युत पुरवठा खंडीत केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कृषी पंपांना मोठ्या प्रमाणात वीज लागत होती. कृषीपंपानाही १० ते ११ तास वीज पुरवठा केला जात होता. याशिवाय सर्वांच्या घरात कुलर, पंखे, एसीचा वापर होत असल्याने मोठ्या प्रमाणात विजेची मागणी होती. परंतु त्या दिवसातही नियमित भारनियमन होत नव्हते. कधी कधी एक किंवा दोन तासाकरिता विद्युत पुरवठा खंडीत होत होता. परंतु आता विजेची मागणी कमी असतानाही दररोज शहरातील वीज पुरवठा खंडीत होत आहे.
या नियमितपणे खंडीत होत असलेल्या वीज पुरवठ्याला भारनियमन असे विद्युत वितरण विभाग मानत नाही. त्यामुळे दररोज वीज पुरवठा खंडित करण्यामागे असे कोणते दुरूस्तीचे काम करावे लागत आहे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. पाऊस पडल्यामुळे आता वीजेची मागणीही जास्त नाही. तरीही महावितरणकडून ग्राहकांचा छळ सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)