भुयारी गटार योजना थंडबस्त्यात

By Admin | Updated: April 14, 2017 01:44 IST2017-04-14T01:44:48+5:302017-04-14T01:44:48+5:30

राजकीय हेवेदाव्यांतून अडकून पडलेल्या भुयारी गटार योजनेला शासनाने हिसकावून घेतले होते.

Underground drainage scheme | भुयारी गटार योजना थंडबस्त्यात

भुयारी गटार योजना थंडबस्त्यात

नियोजन बिघडले : सहा महिने लोटूनही फेर प्रस्तावाची प्रतीक्षा
कपिल केकत  गोंदिया
राजकीय हेवेदाव्यांतून अडकून पडलेल्या भुयारी गटार योजनेला शासनाने हिसकावून घेतले होते. मात्र केंद्र शासन पुरस्कृत युआयडीएस एसएमटी अभियानातील ही योजना ‘अमृत’ योजनेंतर्गत गोंदियाला परत दिली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला व्यवस्थापनाचे काम देऊन पुनर्प्रस्ताव सादर करण्यासाठी सविस्तर प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यास सांगितले आहे. मात्र जुनी मंजूर योजना रद्द होऊन सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी नवीन प्रस्ताव तयार होऊ शकला नाही. त्यामुळे भुयारी गटार योजना प्रत्यक्ष साकारण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार? अशी प्रतीक्षा गोंदियावासीयांना लागली आहे.
शहराचा विकास व्हावा या उद्देशातून शासनाकडून नवनवे प्रयोग केले जातात. विकासाच्या या प्रयोगांना शहरात अंमलात आणावे या दृष्टीने येथील जनप्रतिनिधींच्या प्रयत्नाने शहराला भुयारी गटार योजना मिळाली. केंद्र शासन पुरस्कृत युआयडीएसएसएमटी अभियानांतर्गत केंद्र शासनाने सन २०१३ मध्ये या १२५.७२ कोटींच्या योजनेला मंजूरी दिली होती. तसेच नगर परिषदेस या योजनेसाठी पहिला हप्ता तसेच केंद्र व राज्य शासनाचा निधीही तेव्हाच उपलब्ध करवून देण्यात आला होता.
दरम्यान ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला हस्तांतरीत करण्यात आली. दुसरीकडे पैसे नसतानाही नगर परिषदेचे पदाधिकारी ही योजना स्वत: राबविण्यासाठी अडून बसली होती. याच भानगडीत योजनेच्या कामाला सुरूवात होऊ शकली नाही.
या लेटलतिफ कारभारामुळे या योजनेला भविष्यात केंद्र शासनाकडून कोणतेही अर्थसहाय्य मिळण्याची शक्यता उरली नव्हती. त्यामुळे शासनाने गोंदियाला मिळालेली ही योजना रद्द करून युआयडीएसएसएमटी अभियानातील ही योजना केंद्र शासनाच्या सध्याच्या ‘अमृत’ या योजनेतून देण्याचे ठरविले. त्यानुसार योजनेच्या कामासाठी सुधारित किंमत ठरवून तसा प्रस्ताव सादर करण्यासाठी हे काम महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे देण्यात आले आहे. मजीप्राकडून योजनेचा सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
गेल्या सहा महिन्यांच्या काळात मजीप्राकडून रिपोर्ट बनविण्याचे काम सुरू असल्यामुळे हे काम किती संथगतीने सुरू आहे याची कल्पना येत आहे.
यामुळे गोंदियाला नव्याने मिळणारी ही योजना आता किती किमतीची राहील, त्यासाठी किती निधी मंजूर होईल, किती दिवसात किती निधी मिळेल, योजनेचे काम प्रत्यक्षात कधी सुरू होऊन कधी पूर्णत्वास जाईल असे अनेक प्रश्न सध्या गोंदियावासीयांच्या मनात घोंघावत आहेत.

व्याजासह निधी केला परत
ही योजना रद्द करण्यात आल्याच्या आदेशातच मिळालेला निधी व्याजासह परत करण्याचे निर्देश होते. त्यानुसार नगर परिषदेने भुटारी गटार योजनेंतर्गत प्राप्त ५६ कोटी ५७ लाख ३० हजार रूपयांचा निधी व त्यावरील १६ कोटी १९ लाख ६७ हजार ७४१ रूपये व्याज अशी एकू ण ७२ कोटी ७६ लाख ९७ हजार ७४१ रूपयांची रक्कम नगर परिषद प्रशासन संचालनालय आयुक्तांकडे परत पाठविली आहे. विशेष म्हणजे व्याजातील ६८ लाख ६० हजार ४९ हजार रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती आहे.
राजकीय हेव्यादाव्यांतून योजना फसली
नगर परिषदेची ही योजना शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधीकरणला हस्तांतरीत केली होती. मात्र नगर परिषद ही स्वत: कार्यान्वित करण्यासाठी अडून बसली होती. राजकीय हेवेदाव्यांतून योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. चार वर्षे विनाकारण योजना पडून असल्याने अखेर शासनाने कठोर पाऊल उचलत युआटडीएसएसएमटी मधील ही योजनाच रद्द करून टाकली होती. त्यामुळे राजकीय हेवेदाव्यांतूनच ही योजना फसल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: Underground drainage scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.